पीटीआय, न्यूयॉर्क/ वॉशिंग्टन/ नवी दिल्ली

‘भारत आणि अमेरिकेत व्यापारावरील चर्चेवर लवकरच यशस्वी तोडगा काढला जाईल आणि त्यात कुठलीही अडचण येणार नाही,’ असा विश्वास एकीकडे व्यक्त करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसरीकडे युरोपीय संघाला भारत आणि चीनवर शंभर टक्के आयातशुल्क लागू करावे, असे आवाहन केले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी दबाव वाढावा, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांत युरोपनेही सहभागी व्हावे, असे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रूथ सोशल’वर मंगळवारी टिप्पणी केली, की ‘भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापाराच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. माझे अतिशय चांगले मित्र पंतप्रधान मोदी यांच्याशी येत्या काही आठवड्यांत संवाद साधण्यास मी उत्सुक आहे. दोन महान देशांना या चर्चेतून यशस्वी तोडगा काढण्यात कुठलीही अडचण येईल, असे वाटत नाही.’

ट्रम्प यांच्या या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘एक्स’वर टिप्पणी करून सकारात्मक प्रतिसाद दिला. मोदी म्हणाले, ‘दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या चर्चेतून लवकरच मार्ग निघेल आणि दोन्ही देशांतील भागीदारीमधील अमर्यादित क्षमता पुढे येईल. भारत आणि अमेरिका नैसर्गिक भागीदार आहेत. दोन्ही देश व्यापारावरील चर्चेला लवकरात लवकर मूर्त स्वरूप देण्यासाठी काम करीत आहेत. मीदेखील अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलण्यास उत्सुक आहे. आपल्या दोन्ही देशांतील जनतेच्या उज्ज्वल, समृद्ध भवितव्यासाठी आपण एकत्र काम करू.’ मोदी यांनी केलेली पोस्ट ट्रम्प यांनीही त्यांच्या सामाजिक माध्यमावर सर्वांना शेअर केली. अमेरिकेबरोबर मुक्त व्यापारासाठी भारत सातत्याने संवाद साधत आहे, असे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनीही स्पष्ट केले.

उभयतांमधील या संवादाने भारत-अमेरिकेमध्ये गेल्या काही काळात तयार झालेले तणावपूर्ण संबंध निवळण्याची आशा निर्माण झाली असतानाच ट्रम्प यांनी युरोपीय संघाला भारत आणि चीनवर शंभर टक्के आयातशुल्क लागू करण्याचे आवाहन केले. ट्रम्प यांच्या या दुटप्पीपणाच्या भूमिकेमुळे भारत-अमेरिकेमधील संबंधांतील तणाव कायम असल्याचे चित्र आहे.

एका इंग्रजी माध्यमात याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अमेरिका आणि युरोपीय संघाच्या अधिकाऱ्यांमध्ये युक्रेन युद्धावर वॉशिंग्टनमध्ये बैठक सुरू होती. युक्रेन युद्धासाठी रशियाला मोजावी लागणारी रक्कम अधिक कशी करता येईल, याबाबत ही बैठक होती. युरोपीय संघ भारत आणि चीनवर जितका कर लावेल, तितका कर लावण्यास अमेरिकेची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नव्हारो यांची टीका सुरूच

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर आयातशुल्कवाढीचा तणाव कायम राहील, या दिशेने भूमिका घेत असताना त्यांचे व्यापार सल्लागार पीटर नव्हारो यांनीही ‘अमेरिकेला भारताबरोबर अयोग्य पद्धतीचा व्यापार करण्याची गरज नाही. मात्र, भारताला अमेरिकेची बाजारपेठ हवी आहे. येथील नोकऱ्याही त्यांना हव्या आहेत,’ असे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा सुरू असल्यासंबंधी टिप्पणी केल्यानंतर नव्हारो यांनीही मत व्यक्त केले आहे. रशिया-युक्रेन युद्धाला भारत खतपाणी घालत आहे, या त्यांच्या यापूर्वीच्याच बिनबुडाच्या टिप्पणीचा पुनरुच्चार त्यांनी केला.