‘२००८ च्या मुंबई हल्ल्यांची योजना आखताना दहशतवाद्यांनी गुगल इमेजेसच्या सहाय्याने मुंबई शहराची रेकी केली. इंटरनेटवरील नकाशे आणि गुगल अर्थवरील सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून देशातील प्रत्येक भागाची माहिती काढता येते,’ असा दावा किसालया शुक्ला या वकिलाने दिल्ली उच्च न्यायलयात गुगल मॅप्ससंदर्भात केलेल्या एका याचिकेत केला आहे. गुगल मॅप्समुळे भारताची एकात्मता धोक्यात आल्यासंदर्भातील याचिका किसालया शुक्ला यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील अतीसंवेदनशील परिसराची माहिती गुगल मॅप्स आणि गुगल अर्थसारख्या माध्यमांवर उपलब्ध असल्याचे शुक्ला यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. ‘मुंबई हल्ल्यांमध्ये जिवंत पकडण्यात आलेल्या एकमेव दहशतवाद्याने हल्ल्यांसंदर्भातील अभ्यास करण्यासाठी आणि हल्ल्याची ठिकाणी निवडण्यासाठी गुगलचा वापर केल्याची कबुली दिली होती,’ असा संदर्भही शुक्ला यांनी आपल्या याचिकेमध्ये दिला आहे. त्यामुळेच गुगल मॅप्ससारख्या तंत्रज्ञानाचा भारताच्या एकात्मतेचा धोका असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.

‘इंटरनेटवरील नकाशे आणि गुगल अर्थवरील सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून देशातील प्रत्येक भागाची माहिती काढता येते. त्यामुळेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सामन्यांना काही ठराविक परिसरांमध्ये बंदी घालण्याचा काहीच उपयोग नाही,’ असे शुक्ला यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. इतकचं नाही तर केवळ भारताचा इंत्यभूत आणि बारीक सारीक माहिती असणारा नकाशा देशाबाहेरील कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला देण्याचा अधिकार केवळ भारत सरकारकडे असल्याचेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. तसेच सध्या खाजगी कंपनीच्या सेवांवर अवलंबून असणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी सरकारनेच नवीन नॅव्हीगेशन सिस्टीम तयार करावी, अशी मागणीही या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.

गुगलला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर भारताचा नकाशा अपलोड करण्यापासून थांबवा येण्यासंदर्भातील शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायलयातील मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्यायमुर्ती सी. हरी शंकर यांच्या खंडपीठाने दिले आहेत.  याचिकाकर्ते शुक्ला यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायालयाने गुगलला भारताचे नकाशे वापरण्यापासून थांबवता येऊ शकते का यासंदर्भात सरकारने लक्ष्य घालावे असे निर्देश दिले आहेत. तसेच सरकारने गुगलला भारतीय कायद्यांनुसार नकाशे वापरण्यासंदर्भात सुचना करायला हव्यात अशा सुचनाही न्यायलयाने सरकारला केल्या आहेत.

भारतातील संवेदनशील जागांचे नकाशे गुगल मॅप्स आणि गुगल अर्थवर उपलब्ध असल्याने या जागांची माहिती विरोधी राष्ट्रांना मिळू शकते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार शुक्ला यांनी ‘२००८ च्या मुंबई हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांनी गुगल इमेजेसची मदत घेतल्याचा’ दावा केला आहे. मुंबई हल्ल्यांच्या वेळी दहशतवाद्यांना शहरामधून फिरण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती, असे वृत्त ‘बिझनेस इनसायडर’ने दिले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorists involved in the 2008 mumbai attacks used google maps and images says plea in delhi high court scsg
First published on: 26-07-2019 at 15:02 IST