पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात २०१४पासून अघोषित आणीबाणी लादली आहे अशी टीका काँग्रेसने बुधवारी केली. सरकारला २०२४ची निवडणूक हरण्याची भीती वाटत असताना ही परिस्थिती अधिक बिघडत असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले.
‘न्यूजक्लिक’चे संस्थापक-संपादक प्रबीर पूरकायस्थ यांना अटक केल्यानंतर विरोधी पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशात १९७५-७७ यादरम्यान आणीबाणी लागू केली होती तेव्हा पूरकायस्थ यांनी त्याविरोधात लढा दिला होता अशी आठवण रमेश यांनी करून दिली. तसेच परंजॉय गुहा ठाकुरता हे पंतप्रधानांच्या आवडत्या उद्योगसमूहासंबंधी अथकपणे संशोधन करत असल्याने ‘मोदानी’ सत्ता त्यांच्यावर सूड उगवत आहे अशी टीका रमेश यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये केली.
हेही वाचा >>>आप खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक, मद्य घोटाळ्याप्रकरणी १० तासांच्या चौकशीनंतर कारवाई
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मजबूत पुराव्यांच्या आधारे न्यूजक्लिकवर कारवाई केल्याचा दावा करत भाजपने बुधवारी त्याचे समर्थन केले. भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल, कारण अशा घटकांना कठोरपणे हाताळण्यासाठी लोकांनी मोदी सरकारला सत्ता दिली आहे असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला. काँग्रेस व इंडिया आघाडीच्या इतर घटकपक्षांनी न्यूजक्लिकला पाठिंबा दिल्याबद्दल भाटिया यांनी टीका केली.
टिप्पणी न करण्याची अमेरिकेची भूमिका
या कारवाईविषयीचे वृत्त आम्ही पाहिले आहे, पण न्यूजक्लिकचे चीनशी संबंध असल्याच्या दाव्याच्या सत्यतेविषयी आम्ही काही टिप्पणी करू शकत नाही अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ही बाब स्पष्ट केली. अमेरिकेमधील न्यू यॉर्क टाइम्सने ऑगस्टमध्ये ‘न्यूजक्लिक’ आणि चीन यांच्यादरम्यान असलेल्या कथित संबंधांविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते.