क्रिकेटचा विश्वचषक आता अखेरच्या टप्प्यात आला असून केवळ भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चारच संघ विश्वचषकाच्या शर्यतीमध्ये शिल्लक राहिलेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड हा उपांत्य फेरीतील पहिला सामना आज मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार आहे, तर 11 जुलै रोजी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा दुसरा सामना होईल. दोन्ही सामन्यातील विजेत्यांमध्ये 14 जुलै रोजी अंतिम सामना पार पडेल. त्यापूर्वी उपांत्य फेरीमध्ये कोण जिंकणार आणि अंतिम सामना कोण गाठणार याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. त्यामुळे आज जाणून घेऊयात क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस उपांत्य फेरीत विजय मिळवणाऱ्या आणि एकदाही उपांत्य फेरीत पराभवाचा सामना न करावा लागलेल्या संघाबद्दल.
न्यूझीलंड –
सर्वप्रथम जाणून घेऊयात न्यूझीलंड संघाबाबत. न्यूझीलंड संघाने यंदा आठव्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यापूर्वी सात वेळेस उपांत्य फेरीत पोहोचून देखील हा संघ तब्बल 6 वेळेस पराभूत झालाय तर केवळ एकदाच (2015) त्यांना अंतिम फेरीत पोहोचता आलं . त्यावेळेस देखील त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
इंग्लंड-
क्रिकेटचे जन्मदाते म्हणून इंग्लंडला ओळखले जाते. मात्र, इंग्लंड संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषकावर नाव कोरता आलेले नाही हे विशेष. इंग्लंड संघाने यंदा सहाव्यांदा उपांत्य फेरीत मजल मारली आहे. यापूर्वी पाच वेळेस उपांत्य फेरीत पोहोचून देखील हा संघ दोन वेळेस उपांत्य फेरीत पराभूत झालाय. तर तीन वेळेस (1979,1987,1992 ) अंतिम फेरीत पोहोचून देखील इंग्लंड संघ विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरलाय.
भारत –
भारतीय संघाने आतापर्यंत सहा वेळेस उपांत्य फेरीचा सामना खेळला असून तीन वेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यंदा भारतीय संघाने सातव्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 1983 आणि 2011 साली भारताने विजेतेपद पटकावलं, तर 2003 साली भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
ऑस्ट्रेलिया-
१९७५ पासून विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली, तेव्हापासून आजतागत क्रिकेट विश्वावर ऑस्ट्रेलिया संघाचे वर्चस्व दिसून येते. यंदा ऑस्ट्रेलिया संघ तब्बल आठव्यांदा उपांत्य फेरीत पोहचला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सातही वेळेस त्यांनी आपला उपांत्य फेरीतील सामना जिंकला आहे. म्हणजेच उपांत्य फेरीत एकदाही या संघाने पराभवाचं तोंड पाहिलेलं नाही. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाचवेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. तर दोन वेळा संघाला उपविजेतेपदावर(1975 आणि 1996) समाधान मानावे लागले आहे. आता आठव्यांदा ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. त्यांची लढत यजमान इंग्लंडशी होत आहे.
 क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ असला तरीही विश्वचषकातील आकडे सर्वकाही बोलून जातात. त्यामुळे २००३ प्रमाणे पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत होण्याची शक्यता आहे.
क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ असला तरीही विश्वचषकातील आकडे सर्वकाही बोलून जातात. त्यामुळे २००३ प्रमाणे पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत होण्याची शक्यता आहे.
 
  
  
  
  
  
 