पीटीआय, श्रीनगर
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात गडोले जंगलात लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांबरोबर सुरू असलेली सुरक्षा दलांची चकमक मंगळवारी सातव्या दिवशी थांबली. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी ही माहिती दिली.




या चकमकीत सैन्याचे दोन अधिकारी, एक पोलीस अधिकारी आणि एक जवान अशा चार सुरक्षा दलाच्या सदस्यांचा मृत्यू झाला. विजय कुमार यांनी सांगितले की, ‘आतापर्यंत लष्करचा कमांड उझैर खानचा मृतदेह सापडला आहे. अन्य एका दहशतवाद्याचा मृतदेह दिसत आहे. मात्र अद्याप तो ताब्यात घेता आलेला नाही’.
गडोले जंगलामध्ये गेल्या बुधवारी ही चकमक सुरू झाली होती. ती संपली असली तरी शोधमोहीम अद्याप संपलेले नाही. स्फोट न झालेली अनेक स्फोटके पेरलेली असू शकतात, ती शोधून नष्ट केली जातील असे पोलिसांनी सांगितले. तसेच लोकांना त्या भागात न जाण्याचेही आवाहन केले. तिसऱ्या दहशतवाद्याचाही मृतदेह जंगलात कुठेतरी असू शकेल. त्याविषयी शोधमोहीम संपल्यानंतर अधिक काही सांगता येईल असे कुमार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>“एकेकाळी पंडित नेहरुंच्या हाती असलेला सेंगॉल..”, नव्या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महत्त्वाचं भाष्य
सरकारचा दावा परिस्थितीशी विसंगत -ओमर अब्दुल्ला
जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती केंद्र सरकार दावा करत असलेल्या दाव्यापेक्षा विसंगत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी केली. केंद्र सरकार खोटे दावे करून सत्य लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘अनंतनाग चकमकीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती किती शांततापूर्ण आहे याचा अंदाज तुम्हाला लावता येईल,’ असे ते म्हणाले.
शहीद जवानाला श्रद्धांजली
जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सैन्य, पोलीस आणि राज्य प्रशासनाने अनंतनाग चकमकीत मारले गेलेले शिपाई प्रदीप सिंह यांना सोमवारी फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली. चकमक झालेल्या गडोले जंगलात सिंह यांचा मृतदेह आढळला.