नवी दिल्ली : काँग्रेसने प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर शनिवारी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी ३३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपनेही दुसरी यादी जाहीर केली असून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे व त्यांच्या समर्थकांना संधी देण्यात आली आहे. विधानसभेच्या २०० जागांसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत (सरदारपुरा), त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट (टोंक), विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी (नाथद्वारा) व प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग डोटासरा (लक्ष्मणगढ) यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. ३३ पैकी २९ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. उर्वरित ४ उमेदवारांना २०१८च्या निवडणुकीत पराभूत होऊनही पुन्हा संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा >>>भारताने कॅनडाच्या ४१ अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले, अमेरिकेकडून काळजी व्यक्त, म्हणाले…
बसपमधून आलेल्या ललित यादव यांनाही उमेदवारी
मिळाली आहे. या यादीत सचिन पायलट यांच्या चार पाठीराख्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलटांच्या समर्थक उमेदवारांना वगळले जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. दुसऱ्या यादीमध्ये विद्यमान आमदारांना वगळण्याची संधी आहे.
भाजपने ८३ उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली असून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे पारंपरिक झालरापाटन मतदारसंघातून निवडणूक लढवतील. यापूर्वी १९८५ मध्ये त्या ढोलपूरमधून पहिल्यांदा आमदार झाल्या होत्या. पाच वेळा आमदार राहिलेल्या चित्तौडगडमधील नरपत सिंग राजवी यांना तिकीट नाकारले होते पण, नव्या यादीत त्यांना विद्याधर नगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
मध्यप्रदेशसाठी भाजपची पाचवी यादी
मध्यप्रदेशसाठी भाजपने शनिवारी ९२ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. २३० पैकी २२८ जागांवर पक्षाने उमेदवार निश्चित केले आहेत. शिवपुरीमधील विद्यमान आमदार व ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आत्या यशोधरा राजे यांनी प्रकृतीच्या कारणांसाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शिवपुरी मतदारसंघात देवेंद्र कुमार जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेससोडून भाजपमध्ये आलेले सचिन बिर्ला, सिध्दार्थ राज यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.