चार दशकांपासून युद्ध न झाल्याने लष्कराचे महत्त्व कमी झाले. यामुळे सुरक्षेसंबंधीच्या मुद्दय़ांवर दुर्लक्ष करण्यात आले, असे वक्तव्य संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी जयपूर येथे केले. तसेच याचा अर्थ आपण युद्धाच्या बाजूचे असल्याचा होत नसल्याचे त्यांनी माध्यमांचे नाव न घेता स्पष्ट केले.
भारतीय लष्कराच्या दोन पिढय़ा या कोणत्याही युद्धात सहभागी न होताच निवृत्त झाल्या. जवळपास ४० वर्षे भारतीय सैन्याने कोणतेही युद्ध लढलेले नाही. माजी सैनिकांकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले गेले. तसेच राज्यांकडूनही माजी सैनिकांवर अन्याय झाला. याबाबत त्यांच्या अनेक प्रश्नांवर आपण राज्यांशी चर्चा केली व ते सोडविले. तसेच राज्यांना अंतर्गत सुरक्षेवर कडक पावले उचलण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया व सायबर हल्ले आणि देशात खपविल्या जाणाऱ्या खोटय़ा नोटा हे भारतातील अंतर्गत सुरक्षेला धोकादायक असल्याचे स्पष्ट केले. देशाला फक्त बाहेरील शक्तींकडून धोका नसून देशांतर्गत शक्तीही देशाला धोका पोहोचवत आहेत. यावर गंभीरतेने विचार व्हायला हवा, असे परखड मत त्यांनी मांडले.
यावेळी माध्यमांनी त्यांच्या वक्तव्यांचा विपर्यास केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच म्यानमार कारवाईवरून भारतीय लष्कराचे मनोबल उंचावले असून या कामगिरीवरून लष्कराचे कौतुकही त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकच्या संरक्षणमंत्र्यांचे भारतविरोधी फुत्कार
इस्लामाबाद : इस्लामाबादची युद्धसामग्री आम्ही फक्त सजावटीसाठी नाही ठेवलेली. गरज पडल्यास त्याचा भारताविरोधात वापर करू, असे फुत्कार म्यानमारच्या कारवाईनंतर गर्भगळीत झालेल्या पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी काढले आहेत.  इस्लामाबादमध्ये ते एका कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय राज्यकर्त्यांकडून मागील काळात केल्या गेलेल्या विधानांवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न केला. दहशतवादाविरोधात उघडलेल्या कारवाईवरून पाकिस्तानचे लक्ष वळविण्याचा भारतीय नेत्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The importance of the army deteriorated due to lack of wars say manohar parrikar
First published on: 17-06-2015 at 03:25 IST