आपण किलोग्रॅमचे जे अधिकृत वजन वापरतो त्याचेच वजन आता वाढले आहे. एक किलोग्रॅम वजनाच्या मापनासाठी एक दंडगोल धातूचा गोळा तयार करण्यात आला असून तो मूलभूत वस्तुमानाच्या या एककाचा पुरावा आहे. परंतु न्यूकासल विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की, या धातूच्या गोळ्यावर हायड्रोकार्बनचा थर बसून या मूळ एक किलोग्रॅम वजनात काही मायक्रोग्रॅमची भर पडली आहे. हे मानक १८७५ मध्ये निश्चित करण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून विविध देशात किलोग्रॅमची व्याख्या वेगळी असू शकते असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ज्या वैज्ञानिक प्रयोगात किलोग्रॅमचा अचूक वापर अपेक्षित असतो ते प्रयोग यामुळे चुकत असणार हे निश्चित आहे.आंतरराष्ट्रीय व्यापारातही त्याचा परिणाम होत असणार हे उघड आहे.
मूल किलोग्रॅम या वजनाचे आंतरराष्ट्रीय पूर्व रूप हे खरे मानक असून ते वस्तुमानाशी संतुलित करून ठेवलेले आहे. पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय वजने व मापे संस्थेत हे वजन जपून ठवले आहे. १८८४ मध्ये त्याच्या ४० अधिकृत प्रतिकृती तयार करून त्या अनेक देशांना प्रमाणित वस्तुमानासाठी देण्यात आल्या. आता प्रा. पीटर कम्पसन व डॉ. नावको सानो यांनी एक्स रे फोटोइलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी या तंत्राने या प्रमाणित वजनाच्या दंडगोलाचा अभ्यास केला असता त्यावर हायड्रोकार्बनचा थर दिसून आला व आता तो काढायचा कसा हा प्रश्न आहे. किलोग्रॅमच्या वजनावर ओझोन व अतिनील किरणांचा वापर केल्यास ते स्वच्छ करता येतील, असे लाइव्हसायन्सने म्हटले आहे. न्यूकासल विद्यापीठातील मायक्रो इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टीमचे प्रा. पीटर कम्पसन यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले आहे.
कम्पसन यांच्या मते, मूळ एक किलोग्रॅमचे वजन तसेच त्याच्या ४० प्रतिकृती यांच्यावर काही प्रमाणात वेगळ्याच पदार्थाचे थर कमी-जास्त प्रमाणात बसले आहेत. वजनातील हा फरक १०० मायक्रोग्रॅम एवढाच असेल त्यामुळे तो फारच नगण्य आहे. परंतु वस्तुमानाचा विचार करता हा कमी प्रमाणातील फरकही जागतिक मोजपट्टीवर मोठा ठरतो. किरणोत्सर्गी कचरा किंवा इतर मौल्यवान धातू यांच्या मापनात मायक्रोग्रॅमचा फरकही फार महत्त्वाचा ठरत असतो. या किलोग्रॅमच्या वजनांना अतिनील किरण व ओझोनने धुतले तर त्यावरील कार्बनी पदार्थ नष्ट होतात व ते मूळ वजनाइतके अचूक होते. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘मेट्रोलॉजिया’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.