जगातले सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष अशी ख्याती असलेले बराक ओबामांची कोणत्याही अन्य जागतिक राजकीय नेत्याशी एवढी मैत्री नसेल, जेवढी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर आहे. दोन्ही नेत्यांमध्ये कमालीची केमिस्ट्री पाहायला मिळते. मंगळवारी मोदी जेव्हा दुसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल होतील, तेव्हा याची अनुभूती येईल. दोन्ही नेते एकमेकांना सातव्यांदा भेटत आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या दोन देशांच्या नेत्यांना एकदुसऱ्याच्या जवळ येण्यास एकसारखे कारण आहे. एका बाजूला चीनला शह देण्यासाठी अमेरिका भारताकडे सहयोगी राष्ट्र म्हणून पाहात असताना, अमेरिकी कंपन्यांच्या भारतातील गुंतवणूकीद्वारे भारत आपल्या अर्थव्यवस्थेला मोठ्याप्रमाणावर चालना देऊ पाहात आहे.
ओबामा आणि आपण खास मित्र असून, आपले विचार जुळत असल्याचे मोदींनी गेल्या महिन्यातील एका मुलाखतीदरम्यान म्हणाले होते. भारत भेटीवर आलेल्या ओबामांनीदेखील मोदी आपले मित्र असल्याचे म्हटले होते. दोन्ही नेत्यांनी खास मैत्रीसाठीचे वातावरण निर्माण केल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेंजामिन रोड्स यांनी म्हटले आहे. २०१४ पासून ओबामा आणि मोदी यांची सहा वेळा भेट झाली आहे. अनेकवेळा दोघांनी फोनवर संभाषण केले आहे. यावरून दोघांमध्ये किती घनिष्ट नाते आहे, हे जाणवत असल्याचे बेंजामिन म्हणाले. आपला कार्यकाळ संपण्यापूर्वी एकदा भेटण्याचे निमंत्रण ओबामांनी मोदींना दिले होते. ज्याचा स्वीकार मोदींनी केला असून, अमेरिकेत काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांना मोदी संबोधित करतील. हा एक फार मोठा सन्मान मानला जातो.