काही विशिष्ट औषधांच्या किमती कमी करून विकण्याचा निर्णय झाल्यास औषधनिर्मात्या कंपन्यांनी त्याची तातडीने अंमलबजावणी करून विक्री न झालेली ती औषधे पूर्वीच्याच किमतींना विकू नये, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
काही विशिष्ट औषधे खूप महाग असतात. ती सर्वसामान्यांना स्वस्त दरात उपलब्ध व्हावीत यासाठी त्यांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला तर औषधनिर्मात्या कंपन्यांनी १५ दिवसांच्या आत नव्या किमती लागू कराव्यात आणि विक्री न झालेली औषधे आधीच्याच किमतीने विकू नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. एम. लोढा आणि कुरियन जोसेफ यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
महाग औषधे कमी किमतीत विकण्याचे आदेश निघाल्यास नवी किंमत महिन्याच्या १५ तारखेनंतर लागू व्हावी व त्याआधी विक्री न झालेली औषधे सुधारित किमतीला न विकता त्यांच्या मूळ किमतीलाच विकण्याची परवानगी असावी, अशी याचिका औषधनिर्मात्या कंपन्यांनी दाखल केली होती.