गेली काही वर्ष दिवाळीच्या काळात नासाने अवकाशातून भारताचा काढलेला एक फोटो नेहमी वायरल होत आला आहे, त्याबाबत स्पष्टीकरण नासाने दिलं आहे. दिवाळीच्या काळात नासाच्या कृत्रिम उपग्रहाने काढलेला भारताच्या नकाशाचा एक फोटो नेहमी वायरल होत आला आहे. यामध्ये दिवाळीतील प्रकाशाच्या झगमगटामुळे भारत कसा उजळून निघाला आहे, सगळ्यात धुमधडाक्यात दिवाळी ही उत्तर भारतात साजरी केली जाते इथपासून ते अवकाशातून अंतराळवीरांना भारत देशाच्या आकाशात फटाक्यांची सुरु असलेली आतषबाजी स्पष्ट दिसते वगैरे असे दावे केले जातात, असे मेसेजसुद्धा एकमेकांना पाठवले जातात.

यावर नासाच्या NASA History Office या ट्विटरने फोटोसह स्पष्टीकरण दिलं आहे. यामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. नासाच्या Suomi NPP पर्यावरणाशी संबंधित पृथ्वीची छायाचित्रे काढणाऱ्या ध्रुवीय उपग्रहाने १२ नोव्हेंबर २०१२ ला इन्फ्रारेड तरंगलांबीच्या माध्यमातून काढलेले भारताचे संबंधित छायाचित्र काढले आहे. यामध्ये शहरे ही स्पष्ट दिसावीत यासाठी संबंधित फोटो हा जरा तेजस्वी ( bright ) करण्यात आला असल्याचं स्वतः नासानेच स्पष्ट केलं आहे. या फोटोमध्ये मुंबई, दिल्ली, बंगळूरू, कोलकत्ता, कराची ही शहरे चिन्हांकित करुन दाखवण्यात आली आहे. 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवाळीनिमित्त केलेली आतषबाजी, दिवाळीनिमित्त वाढलेला प्रकाशाचा झगमगाट हा शहरातील प्रकाशाच्या तुलनेत अंधुक असल्याने अवकाशातून याची वेगळी नोंद घेता येणं शक्य नसल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात भारत देश हा अवकाशातून जास्त उजळलेला दिसतो हा समज चुकीचा असल्याचं नासाने स्पष्ट  केलं आहे. Suomi NPP या उपग्रहाचा कार्यकाल हा १५ वर्षांपेक्षा जास्त होता. तेव्हा याआधी अवकाशातून रात्रीची काढण्यात आलेली छायाचित्रे, Suomi NPP उपग्रहाने वेळोवेळी काढलेली छायाचित्रे यांचा तुलनानात्मक अभ्यास केला जात आहे. यामुळे शहरांचा पसारा कसा वाढत आहे वगैरै माहिती ही नोंदवली जाते, ज्याचा उपयोग पर्यावरणाशी संबंधित विविध गोष्टींच्या अभ्यासाकरता केला जात आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थोडक्यात संबंधित दाखवेला फोटो पुन्हा तुमच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून आला आणि पुन्हा काही दावे केले गेले तर त्यामागचे सत्य जाणून घ्या, नासाने दिलेले स्पष्टीकरण समजून घ्या.