आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरू असून, सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. आता भारत-पाकिस्तान सीमेवरील कठुआ येथील हिरानगर सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांना एक १५० मीटर लांबीचा बोगदा आढळून आला आहे. या बोगद्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतात घुसखोरी करण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न, जगासमोर उघड झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक बोगदा आढळून आला आहे. हा बोगदा जवळपास १५० मीटर लांब असून, यामधून काही सिमेंटची पोती देखील हस्तगत करण्यात आली आहे. हे सिमेंट पाकिस्तानमधील कराची येथील असल्याचे दिसून आले आहे. अशी देखील माहिती समोर येत आहे की, हा बोगदा पाकिस्तानच्या पोस्टच्या अगदी समोरूनच खोदला गेला आहे.

या अगोदर देखील बीएसएफला ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील बेंगालड परिसरात २५ फूट खोल व १५० मीटर लांबीचा बोगदा आढळून आला होता. विशेष म्हणजे, या भूयारी मार्गाबरोबरच शक्करगढ, कराची लिहिलेल्या काही वाळूच्या पिशव्याही तिथं सापडल्या होत्या. त्या बोगद्यांपासून पाकिस्तानी लष्कराची चौकी ४०० मीटर अंतरावर असल्याचंही लष्करानं सांगितलं होतं.

घुसखोरीचा मोठा डाव उधळला; BSF ला भारत-पाक सीमेजवळ सापडला २५ फूट खोल बोगदा

पाकिस्तानातून येणारे दहशतवादी अशा भूयारी मार्गांचा भारतात घुसखोरी करण्यासाठी वापर करतात. या बोगदा सापडल्यानं लष्कराला घुसखोरीचा मोठा डाव उधळून लावण्यात यश आलं आहे.

यापूर्वीही लष्कराला जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर अशा प्रकारचे भूयारी मार्ग आढळून आले होते. २०१२मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना ४०० मीटर लांबीचा बोगदा सापडला होता. हा बोगदाही सांबा सेक्टरमध्ये होता. तर दुसरा एक बोगदा पलनवाला सेक्टरमध्ये २०१४ मध्ये आढळला होता. त्याच वर्षी सांबा जिल्ह्यातील छिल्लारी परिसरातही एक भूयारी मार्ग सापडला होता. हा भूयारी मार्ग भारतीय हद्दीत २५ मीटर आतापर्यंत करण्यात आलेला होता. त्याचबरोबर २०१६ मध्ये पाकिस्तानातून येणारा बोगदा आरएस पूरा सेक्टरमध्येही सापडला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The tunnel detected along ib in hiranagar sector of kathua msr
First published on: 13-01-2021 at 16:11 IST