कर्जमर्यादेत अल्प काळासाठी वाढ मिळावी, ज्यायोगे अमेरिकेच्या सरकारचा कारभार पुन्हा एकदा सुरू करता येईल, असे मत अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांशी आर्थिक संकटासह इतर प्रश्नांबाबतही वाटाघाटी करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आह़े मात्र आपल्या शब्दांपेक्षा जगाचे लक्ष आज अमेरिकी काँग्रेसच्या कृतींकडे लागले आहे, आणि हे दुर्दैवी आहे, अशी खंत ओबामांनी व्यक्त केली. शट डाऊनमुळे अमेरिकेचे आठ लाख शासकीय कर्मचारी बेरोजगार झाले आहेत़  पक्षांमधील मतभेदांचा फटका अमेरिकेच्या जनतेला बसतो आहे, हे योग्य नाही. कोणत्याही मतभेदाच्या मुद्दय़ावर वाटाघाटींची माझी तयारी आहे, पण लोकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर करायलाच हवी, असे आवाहन ओबामा यांनी केले.
अर्थव्यवस्थेला मार्गावर आणण्यासाठी कठोर उपाय हवेत!
 रिपब्लिकन पक्षाचे बोएहनर यांनी मात्र ओबामा यांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप घेतले आहेत. जेव्हा वारंवार कर्जाच्या रकमेत वाढ करण्याचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा अर्थव्यवस्था मार्गावर आणण्यासाठी काही कठोर भूमिका घेणे भाग नाही काय, असा सवाल बोएहनर यांनी केला.
अमेरिकेवर आर्थिक मंदीची सावली असताना तेथे अनेक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची संधी आपल्याला आशिया दौऱ्यात मिळणार होती. मात्र आर्थिक कोंडीमुळे हा दौरा रद्द करावा लागला. याची खंत वाटते, असे मत अध्यक्ष ओबामा यांनी व्यक्त केले.
आम्ही कर्जाची परतफेड करूच!
अमेरिकेतील आर्थिक कोंडीमुळे जगावरच आर्थिक मंदीचे सावट पसरले आहे. त्यातच अमेरिकेने कर्जपरतावा न केल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची लक्षणे आहेत. मात्र आम्ही कर्जाची परतफेड नक्की करू, असा विश्वास ओबामा यांनी दिला आहे. ‘जग आज माझ्या शब्दांपेक्षा काँग्रेसच्या कृतींवर जास्त विश्वास ठेवू पाहत आहे, अशी खंतही त्यांनी शेवटी व्यक्त केली.