ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएमला अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी विरोध केलेला आहे. ईव्हीएम मशीन हॅक केल्या जातात, असाही आरोप काहींनी केला होता. लोकसभा निवडणूक जवळ येताच ईव्हीएमच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. आताही काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी जर देशातील ईव्हीएम मशीन ठिक केल्या गेल्या नाहीत. तर भाजपा आगामी निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकेल, असे विधान सॅम पित्रोदा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे.
ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा दावा निवडणूक आयोगाने अनेकदा खोडून काढलेला आहे. यासाठी हॅकेथॉन आयोजित करून मतदान यंत्रावर घेण्यात येणारा संशय दूर करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केलेला आहे. मात्र काँग्रेस आणि विरोधी पक्षातील काही नेते सातत्याने मतदान यंत्रात छेडछाड होत असल्याचा आरोप करत आहेत.
हे वाचा >> राम मंदिर की बेरोजगारी? देशासमोरची महत्त्वाची समस्या कोणती? सॅम पित्रोदांचा सवाल
काँग्रेस नेते पित्रोदा पुढे म्हणाले की, माझ्या राम मंदिरा बद्दलच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने दाखविले गेले. धर्म हा वैयक्तिक विषय आहे आणि याला राजकारणाशी जोडणे उचित नाही.
मतदान यंत्रावर संशय व्यक्त करताना पित्रोदा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकुर यांच्या अध्यक्षतेखालील ‘द सिटिझन्स कमिशन ऑन इलेक्शन’ या एनजीओने एक अहवाल तयार करून विद्यमान ईव्हीएम यंत्राच्या रचनेत बदल करण्याची शिफारस केली होती. पित्रोदा यांनी सांगितले की, या अहवालावर निवडणूक आयोग काहीतरी प्रतिक्रिया देईल, याची मी वाट पाहिली. पण त्यांचे काहीच उत्तर न आल्यामुळे आता मी यावर जाहीर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे.
हे वाचा >> देशकाल: या मतदान यंत्रांचे काय करायचे?
भारताच्या माहिती व तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या व्यक्तींपैकी सॅम पित्रोदा एक आहेत. ते म्हणाले की, ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅटशी जोडले गेल्यानंतर समस्या उद्भवली आहे. व्हीव्हीपॅट यंत्राला सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर जोडलेले असते. ज्यामध्ये गडबड केली जाऊ शकते. तसेच व्हीव्हीपॅटमधून निघणारी पावती थर्मल प्रिंटरमधून काढलेली असते. जी फक्त काही आठवडेच सुरक्षित ठेवली जाते. त्याऐवजी या पावतीसाठी असा प्रिंटर वापरला जावा, ज्याद्वारे पावती पाच वर्षांपर्यंत सांभाळून ठेवता येऊ शकेल.
सॅम पित्रोदा पुढे म्हणाले की, या पावतीला मतदाराच्या हाती दिले जावे. त्याने खातरजमा केल्यानंतर पुढे ठेवलेल्या बॉक्समध्ये पावती टाकली जावी. हा बॉक्स इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसने जोडलेला नसावा. मतमोजणीदरम्यान या पावत्यांचीही मोजमी करावी. ईव्हीएमच्या विरोधात देशातील लोकांनी आता रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहीजे किंवा स्वाक्षरी मोहीम राबवून मतदान यंत्राचा विरोध केला पाहीजे, असेही पित्रोदा म्हणाले.
तर भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील
भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील, याबाबत प्रश्न विचारला असता सॅम पित्रोदा म्हणाले की, जर मतदान यंत्रामध्ये दुरुस्ती केली गेली नाही, तर भाजपाला नक्कीच ४०० हून अधिक जागा मिळतील. जर मतदान यंत्र दुरुस्त केले गेले, तर त्यांना ४०० जागा मिळणे अवघड होईल.