केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात जवळपास वर्षभरापेक्षा अधिक काळ चाललेलं शेतकरी आंदोलन, हे कायदे रद्द करण्यात आल्याची पंतप्रधांनाकडून घोषणा करण्यात आल्यानंतर नुकतच थांबलेलं आहे. मात्र असं असताना आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन सुरू होऊ शकतं, असा सूचक इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिल्याचं समोर आलं आहे.

सरकारने सध्या केवळ तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. उर्वरित मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. आश्वासनांची पूर्तता न केल्यास पुन्हा आंदोलन होऊ शकते. याचवेळी त्यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ते भाजपपेक्षा जास्त धोकादायक आहेत.”

जयपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “केंद्र सरकारने सध्या केवळ तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. मात्र त्यांनी एमएसपी बाबत कायदा केलेला नाही. समिती स्थापन करण्याबाबत सरकार निश्चितपणे बोलले आहे, पण सरकार अतिशय संथ गतीने काम करत आहे. आमची आश्वासने पूर्ण न झाल्यास शेतकरी पुन्हा आंदोलन करू शकतात.”

या दरम्यान त्यांनी हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, “लोकांनी त्यांच्यापासून सावध राहावे. ते भाजपपेक्षा धोकादायक आहेत.” यासोबतच त्यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत सांगितले की, “उत्तर प्रदेशातील शेतकरी त्यांना फायदा मिळवून देणाऱ्या राजकीय पक्षालाच मतदान करतील.”

दरम्यान, पंजाबच्या २२ शेतकरी संघटनांनी शनिवारी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटनांनी एक पक्ष स्थापन केला असून त्याला संयुक्त समाज मोर्चा असे नाव देण्यात आले आहे. या पक्षाचे नेतृत्व शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवाल करणार आहेत. हा पक्ष पंजाब विधानसभेच्या सर्व ११७ जागा लढवणार आहे. पक्ष स्थापनेच्या निर्णयावर राजेवाल म्हणाले की, “पंजाबच्या जनतेची मागणी आणि दबावानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.” शेतकरी संघटनांनी स्थापन केलेल्या पक्षात आणखी तीन शेतकरी संघटना सामील झाल्याची देखील चर्चा आहे.