CJI BR Gavai On Indian Legal System: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. भारतीय न्यायव्यवस्थेसमोर मोठी आव्हाने असून न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता असल्याचं मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केलं आहे. सरन्यायाधीश गवई हे शनिवारी हैदराबाद येथील नालसर लॉ युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी गवई यांनी न्यायव्यवस्थेच्या स्थितीबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई काय म्हणाले?

“भारताची कायदेशीर व्यवस्था मोठ्या आव्हानांना तोंड देत आहे. त्यामुळे तिचं निराकरण करण्याचं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये दशकांपर्यंत चालणाऱ्या खटल्यांचा देखील समावेश आहे. आता मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की आपल्या न्यायव्यवस्थेत सुधारणांची नितांत आवश्यकता आहे. पण तरीही मी भविष्याबद्दल आशावादी आहे की माझे सहकारी नागरिक आव्हानांना तोंड देतील आणि सुधारणा घडवून आणतील”, असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं आहे.

“काही खटल्यांमध्ये विलंब होऊन ते कधीकधी दशकांपर्यंत चालतात. आपण अशा प्रकारचे काही प्रकरण पाहिलेले आहे की जिथे एखाद्या व्यक्तीने वर्षानुवर्षे तुरुंगात कैदी म्हणून घालवल्यानंतर त्याला निर्दोष ठरवण्यात आलेलं आहे”, असं सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले आहेत. तसेच भारतीय न्यायव्यवस्थेसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी येणाऱ्या पिढीवर त्यांनी विश्वासही व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबावर आर्थिक भार टाकण्याऐवजी शिष्यवृत्तीवर विदेशात पुढील शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केलं. आई-वडिलांवर अवलंबून न राहता स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षण घेण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच यावेळी त्यांनी कायदेतज्ज्ञांना प्रभावाच्या आधारावर नव्हे तर प्रामाणिकपणाच्या आधारावर मार्गदर्शक निवडण्याचं आवाहन केलं. या दीक्षांत समारंभाला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पीएस नरसिंहा आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुजॉय पॉल यांच्यासह आदी दिग्गज उपस्थित होते.