कर्नाटक: विश्वासदर्शक ठरावावर निर्णय नाहीच; भाजपा आमदारांचा सभागृहात ठिय्या

कुमारस्वामी सरकारचे काय होणार हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरीत राहिला आहे.

कर्नाटकच्या विधानसभेत आज सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला जाऊन त्यावर मतदान घेण्यासाठी दिवसभर विविध घडामोडी घडत होत्या. या ठरावावर आजअखेर मतदान घेऊन निर्णय घेण्यात येईल असे अपेक्षित होते. मात्र, संध्याकाळपर्यंत मतदान घेण्यात आले नाही उलट विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे आजचे कामकाज तहकूब केले. त्यामुळे कुमारस्वामी सरकारचे काय होणार हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरीत राहिला आहे.

विधानसभेत काँग्रेस-जेडीएस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असे पत्र राज्यपाल वजुभाई वाला यांनी विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांना दिले होते. मात्र, यावर आज दिवसभर केवळ चर्चा झाली मतदान घेतले गेले नाही. शेवटी सभागृह तहकूब करण्यात आल्याने भाजपा आमदारांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपालांच्या पत्राला विधानसभा अध्यक्षांनी उत्तर द्यावे तसेच आजच रात्रीपर्यंत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी या आमदारांनी केली आहे.

कर्नाटकच्या विधानसभेत आज मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. यावेळी सभागृहात सरकारमधील १९ आमदार गैरहजर राहिले. दरम्यान, राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आज दिवसभरात या ठरावावर मतदान घेण्याबाबत विचार करण्याची सूचना केली. मात्र, राज्यपालांच्या या भुमिकेवर काँग्रेसचे आमदार एच. के. पाटील यांनी आक्षेप घेतला. राज्यपालांनी सभागृहाच्या कामकाजात दखल देणे चुकीचे असून ते संविधानविरोधी असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विधानसभेचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आल्याने सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा चर्चेला सुरुवात होईल. त्यावेळी सभागृहात किती आमदार हजेरील लावतात आणि विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण होते की नाही हे स्पष्ट होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: There is no decision on the confidence motion in the karnataka legislative assembly aau