देशात मोदी लाट वगैरे काहीही नाही तर संतापाची आणि परिवर्तनाची लाट आहे अशी टीका काँग्रेसचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर यांनी केली आहे. बेरोजगार, शेतकरी, व्यापारी, तरूण हे सगळे चिडललेले आहेत. जीएसटी आणि नोटाबंदी या दोन निर्णयांमुळे देशाचं वाटोळं झालं आहे. येणाऱ्या निवडणुकीचे निकाल हे अतिशय धक्कादायक असतील असंही सनेर यांनी म्हटलं आहे. येणारे निकाल हे परिवर्तनाची नांदी ठरतील असंही ते म्हटले आहेत.
संपूर्ण देशात भाजपाच्या विरोधातली जनलाट तयार झाली आहे. अनेक राज्यांमध्ये जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्या बाजूने मतदान होईल आणि काँग्रेस हा देशात सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरेल आणि देशावर महाआघाडीची सत्ता येईल असाही अंदाज शाम सनेर यांनी व्यक्त केला आहे. देशातलं सगळं वास्तव लोकांसमोर आलं आहे. तुम्ही सत्ता द्या, प्रधानसेवक म्हणून काम करेन, चौकीदार म्हणून काम करेन या मोदींच्या सगळ्या वल्गना फोल ठरल्या आहेत असाही आरोप सनेर यांनी केला आहे. देशात राफेल कराराच्या माध्यमातून सर्वात मोठा भ्रष्टाचार घडला आहे. हा आपल्या देशावरचा कलंक असून गेल्या साठ वर्षात एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला नाही अशीही टीका शाम सनेर यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जनमत तयार होण्यासाठी राज ठाकरे बोलत आहेत, त्यांच्या सभांमुळे प्रबोधन होतं आहे आणि निश्चितच मतदानावर परिणाम होईल. राज ठाकरे जे बोलत आहेत ते जनतेच्या मनातलंच बोलत आहेत असंही शाम सनेर यांनी म्हटलं आहे. काँग्रेस कार्यकर्ते अविनाश सोनावणे यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विकासाच्या भूलथापा देऊन मोदी सत्तेवर आले मात्र प्रत्यक्षात विकास काहीही घडलेला नाही. त्यामुळे लोक आता परिवर्तनालाच मत देतील असं मत त्यांनी व्यक्त केलं.
काँग्रेस कार्यकर्ते हेमंत शिंदे यांनीही मोदी सरकारवर टीका केली आणि जनतेला मोदी पुन्हा पंतप्रधान पदी बसावेत असं मुळीच वाटत नाही. ग्रामीण भागातले लोक नाराज आहेत असाही आरोप त्यांनी केला. धुळ्यातले लोकसभेचे उमेदवार सुभाष भामरे यांच्यावरही शाम सनेर यांनी टीका केली. सुभाष भामरे यांनी शिवसेनेसोबत झालेल्या एका बैठकीत हे सांगितलं होतं की महापालिका निवडणुकीत मी २ हजार रूपये एका मतासाठी मोजले. सुभाष भामरे यांनी केलेल्या या वक्तव्यावरूनच पैशांचा किती मोठ्या प्रमाणावर वापर लोकसभा निवडणुकीत केला जाईल याचाही अंदाज बांधला जाऊ शकतो असाही आरोप शाम सनेर यांनी केला.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no modi wave in the country anger and transformation wave
First published on: 25-04-2019 at 15:56 IST