सध्याच्या वातावरणात कुणीही फुटीरतावाद्यांशी साधी चर्चा करायचा विषय काढला तरी त्याला देशद्रोही ठरवले जाते. हाच न्याय लावायचा झाला तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही देशद्रोही म्हणायचं का, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फुटीरतावाद्यांकडून करण्यात आलेला हिंसाचार आणि पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल त्यांनी भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पार्श्वभूमीवर बोलताना सिन्हा यांनी म्हटले की, आतापर्यंत हिंसाचाराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे कोणालाही आपला जीव धोक्यात टाकून मतदान करायचे नाही. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर फुटीरवाद्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. तसेच त्यांच्याशी चर्चा करणाऱ्या प्रत्येकावर देशद्रोहीपणाचा शिक्का मारण्याची सवय सोडून द्यावी, असे सिन्हा यांनी म्हटले.  काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करायची असेल तर फुटीरतावाद्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे. भाजप आणि पीडीपीने आश्वासन दिल्याप्रमाणे काश्मीरमधील सर्व घटकांना चर्चेत सामावून घेतले पाहिजे, असेही सिन्हा यांनी सांगितले. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील संबंध गेल्या ७० वर्षांपासून सुधारु शकलेले नाहीत. विश्वासाच्या अभावामुळे हे सगळे घडत आहे. जोपर्यंत पाकिस्तान प्रत्येक गोष्ट नाकारण्याच्या पवित्र्यात आहे तोपर्यंत कोणत्याही चर्चेला अर्थ नसल्याचे सिन्हा यांनी म्हटले.

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळात काश्मिरी जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सरकारने येथीलअनेक घटकांशी चर्चा करण्याची तयारी दाखविली होती. काश्मीर समस्या युद्धाने नव्हे, तर चर्चेतूनच सुटेल, असा विश्वास अटलबिहारी वाजपेयी यांना वाटत होता.  त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात काश्मिरी जनतेच्या आशा उंचावल्या होत्या. मोदी सरकार सत्तेवर आल्याने वाजपेयींच्या पावलावर पाऊल टाकले जाईल व घुसमट संपेल अशी काश्मिरी जनतेची अपेक्षा होती, पण वाजपेयींच्या मार्गाने काश्मीर प्रश्न सोडविण्याची संधी पंतप्रधान मोदी यांनी गमावली, असे परखड मत रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख व वाजपेयी सरकारमधील काश्मीरविषयक सल्लागार ए एस दुलाट यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These days if you talk of dialogue with separatists then you are called anti national does it mean atalbihari vajpeyi was anti national yashwant sinha
First published on: 12-04-2017 at 13:33 IST