Rajkot TRP Game Zone fire : राजकोटमध्ये शनिवारी (२५ मे) टीआरपी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २८ लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी युवराज हरी सिंह सोलंकी आणि राहुल राठोड या दोन भागीदारांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच नुकतेच हा गेमिंग झोन चालविणारा कर्मचारी नितीन जैनलाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या तिघांनाही सोमवारी (दि. २७ मे) १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा मुख्य आरोपी धवल ठक्करला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणात न्यायालयात आरोपींच्या विरोधात युक्तीवाद करणारे सरकारी वकील तुषार गोकानी यांनी माध्यमांशी बोलताना धक्कादायक माहिती दिली. युवराज सोलंकी या आरोपीने न्यायालयात जात असताना घडल्या प्रसंगाचा पश्चाताप असल्याचे नाटक केले. तो रडवेला चेहरा करून न्यायालयात आला. मात्र न्यायालयात आल्यानंतर काही मिनिटांतच निर्लज्जपणे हसून उत्तरे देत होता, असे गोकानी यांनी सांगितले.

तुषार गोकाणी पुढे म्हणाले की, न्यायालयाच्या बाहेर रडणाऱ्या सोलंकीने न्यायालयात आल्यानंतर मात्र नूरच बदलला. त्याने हसत हसत म्हटले की, अशा गोष्टी घडतच असतात. त्याच्या बेमुवर्तखोरीची दखल माननीय न्यायालयानेही घेतली. तसेच राजकोट आगीप्रकरणी एफआयआरमध्ये सहा जणांचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी चार आरोपींना अटक झाली आहे.

तपासादरम्यान आरोपी सहकार्य करत नसल्यामुळेच त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. कागदपत्रांची मागणी केली असता ते जळाले असल्याचे आरोपींकडून सांगण्यात येत आहे. तपासाला सहकार्य मिळावे आणि त्यांच्याकडून सत्य बाहेर काढण्यासाठीच पोलीस कोठडी सुनावली गेली आहे, असेही सरकारी वकील गोकाणी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी राजकोटच्या टीआरपी झोनमध्ये भीषण आग लागली. ज्यामध्ये २८ लोकांचा मृत्यू झाला. टीआरपी गेम झोनचे संचलन करणारी कंपनी रेस वे एंटरप्राइजमधील दोन भागीदार आणि या गेमिंग झोनचे व्यवस्थापक यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच रेस वे एंटरप्राइजचे भागीदार आणि सहआरोपी अशोकसिंह जडेजा, किरीटसिंह जडेजा, प्रकाशचंद हिरण यांचाही या प्रकरणी शोध घेतला जात आहे.