scorecardresearch

Nepal Plane Crash: “शेवटच्या क्षणी प्लॅन बदलला आणि…”, त्या चार भारतीय तरुणांची करुण कहाणी

शेवटच्या क्षणी बसने जाण्याचा निर्णय बदलत त्यांनी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला होता.

Nepal Plane Crash: “शेवटच्या क्षणी प्लॅन बदलला आणि…”, त्या चार भारतीय तरुणांची करुण कहाणी
त्या चार मित्रांचा नेपाळ विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू

नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल (दि. १५ जानेवारी) येती एअरलाईन्स एअरक्राफ्ट या कंपनीच्या विमानाला मोठा अपघात झाला. विमानात असलेल्या सर्व ७२ लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या विमानात पाच भारतीयांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात चार युवक हे उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथील होते. चारही युवक नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते. यापैकी सोनू जैस्वाल नामक तरुणाने तर अपघात होण्याच्या काही सेकंद आधी लाईव्ह व्हिडिओ काढायला सुरुवात केली होती, जी अपघाताच्या दरम्यान देखील सुरु होती. सोनूच्या लाईव्हमध्ये या विमानाच्या अपघाताचा थरार चित्रित झाला आहे.

पोखरामधील विमान दुर्घटनेनंतर गाझीपूरमध्ये शोककळा पसरली आहे. चारही मित्रांच्या निधनामुळे परिसरातील लोकांना मोठा धक्का पोहोचला आहे. या अपघातात सोनू जैस्वाल (३५) सोबत विशाल शर्मा (२२), अनिल कुमार राजभर (२७) आणि अभिषेक कुशवाह (२५) यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या चारही जणांचे मृतदेह गाझीपूर येथे पोहोचले असून त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जातील.

हे वाचा >> …अन् त्यानं स्वत:चा मृत्यूच कॅमेऱ्यात केला कैद, नेपाळमधील विमान दुर्घटनेचा थरकाप उडवणारा VIDEO

पोखरा येथे बसने जाणार होते, मात्र अचानक

या चारही युवकांचा मित्र असलेला दिलीप वर्मा याला जेव्हा अपघाताची बातमी कळली, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. दिलीप वर्माने सांगितले की, “या चारही जणांनी जेव्हा पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन घेतले, त्यानंतर माझ्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. ते लोक बसने पोखरासाठी निघणार असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. मात्र अचानक प्लॅनमध्ये बदल करत त्यांनी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला असावा.” हा विमान प्रवास त्यांचा अखेरचा प्रवास ठरला, याबद्दल दिलीपने हळहळ व्यक्त केली.

हे देखील वाचा >> यशस्वी लँडिंगनंतर अंजू मुख्य पायलट बनणार होती; १६ वर्षांपूर्वी पतीचेही विमान अपघातात निधन, आता अंजूचा मृत्यू

सोनू जैस्वाल दोन मुली आणि एक मुलगा

या अपघातामध्ये सोनूने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओची अनेकांनी चर्चा केली. हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. अगदी काही सेकंदात विमान भस्मसात झाल्याचे यात दिसत आहे. सोनू जैस्वालच्या कुटुंबाची माहिती घेतली तर तो चार भावांमध्ये सर्वात लहान होता. त्याचे लग्न झाले असून त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. यासोबतच २३ वर्षीय विशाल शर्माचाही अपघातात दुर्दैवी अंत झाला. विशाल चारही जणांमध्ये सर्वात लहान होता.

हे देखील वाचा >> …अन् ते हास्य शेवटचं ठरलं,” अपघातग्रस्त विमानातील हवाईसुंदरीचा व्हिडीओ व्हायरल!

अनिल आणि अभिषेकच्या कुटुंबीय धक्क्यात

मृत पावलेले इतर दोन युवक अनिल राजभर आणि अभिषेक कुशवाह यांचे कुटुंबीय देखील धक्क्यात आहेत. अनिल शेतकऱ्याचा मुलगा आहे. अभिषेक तर २३ वर्षांचा होता. त्याचे वडील छोटंसं दुकान चालवतात. चौघेही १२ जानेवारी रोजी वाराणसीच्या सारनाथ येथे गेले होते. तिथून त्यांनी नेपाळमध्ये जाण्याचा प्लॅन बनविला. रविवारी सकाळी त्यांनी काठमांडू येथून पोखरासाठी विमान पकडले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 12:47 IST

संबंधित बातम्या