टोपी दिसताच चोराची देशभक्ती जागी झाली, आणि…

पश्चातापाच्या भावनेतून चोराने लिहिला हा संदेश.

चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या घरफोडयाच्या मनात देशभक्तीची भावना प्रखर झाल्याने अखेर त्याने मोठया चोरीचा बेत रद्द केला. केरळच्या कोच्ची शहरातील तिरुवानकुलममध्ये ही अजब घटना घडली आहे. बंद घराचे कुलूप तोडून आत शिरल्यानंतर आपण निवृत्त कर्नलच्या घरात आलो आहोत, हे चोराच्या लक्षात आले. अचानक त्याच्या मनात देशभक्तीची भावना प्रखर झाली. त्याने मोठया मुद्देमालाची चोरी न करता भिंतीवर बायबलमधील एक संदेश लिहिला व तिथून निघून गेला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

घरातून बाहेर पडताना हा चोर फक्त १५०० रुपये, एक ड्रेस आणि लष्करी दारुची बाटली सोबत घेऊन गेला व भिंतीवर माफीनामा सुद्धा लिहिला. “टोपी पाहिल्यानंतर हे लष्करी अधिकाऱ्याचे घर असल्याचे माझ्या लक्षात आले. मला हे आधी माहित असते तर, मी इथे घरफोडी केली नसती. ऑफीसर मला माफ करा” असे भिंतीवरील संदेशात लिहिले होते तसेच बायबलमधील एक संदेशही लिहिला होता.

या कर्नलच्याच घराच्या बाजूला असलेल्या एका दुकानातून त्याने कागदपत्रांनी भरलेली एक बॅग चोरली होती. ती बॅगही तिथेच सोडली होती. ही बॅग त्या दुकानदाराला परत द्या असे त्या चोराने लिहिले होते. हा कर्नल मागच्या दोन महिन्यांपासून कुटुंबासह बहरीन येथे गेला आहे. सकाळी नोकर झाडलोट करण्यासाठी घरी आल्यानंतर घरफोडी झाल्याचे समोर आले. नोकराने लगेच पोलिसांना याची माहिती दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thief aborts mission at retd colonels house kerala dmp