Bangalore : सोशल मीडियावर अनेक लोक त्यांच्या चांगल्या कृत्यांमुळे चर्चेत असतात, तर अनेक लोक त्यांच्या वाईट कृत्यांमुळे व्हायरल होतात. आता अशाच प्रकारचा एक प्रकार समोर आला आहे. बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका चोराने आपल्या पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी पोलिसांचा गणवेश परिधान करून व्हिडीओ कॉल केला. मात्र, चोराच्या या कृत्यांनंतर एका पोलीस कॉन्स्टेबलवरच मोठी कारवाई झाली आहे.
नेमकं काय घडलं?
बंगळुरूमधील एका पोलीस कॉन्स्टेबलला निष्काळजीपणाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं आहे. चोरीच्या आरोपाखाली एक आरोपी पोलीस कोठडीत होता. पोलीस कोठडीत असताना त्याने एक शक्कल लढवली आणि पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी त्याने एका पोलीसाचा गणवेश परिधान करून स्वत:च्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला. मात्र, त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित पोलीस कॉन्स्टेबलने निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली निलबंनाची कारवाई करण्यात आली आहे.
या चोराविरुद्ध ५० पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चोराच्या या कृत्याचे परिणाम पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला भोगावे लागले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदपुरा पोलीस ठाण्यात तैनात असलेले एक कॉन्स्टेबल यांनी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या सलीम शेखला कोठडीत असताना पोलिसांचा गणवेश घालण्याची परवानगी दिल्याची माहिती आढळून आली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, २३ जून रोजी नोंदवलेल्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात ही घटना उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल फोन डेटाचे विश्लेषण करताना पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन तपासला असता त्यांना एका व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉट सापडला. त्या फोटोमध्ये आरोपीने पोलिसांचा गणवेश घातलेला दिसत होता. त्याबाबत पोलिसांनी त्याला विचारलं असता पोलिसांना आरोपीने सांगितलं की व्हिडीओ कॉलमधील महिला त्याची पत्नी आहे.
दरम्यान, पुढील चौकशीत असं दिसून आलं की आरोपी सलीमला गेल्या वर्षी गोविंदपुरा पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणात अटक केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी त्याला चोरीच्या मौल्यवान वस्तू परत मिळवण्यासाठी बंगळुरूबाहेर नेलं होतं. या प्रवासादरम्यान आरोपीने एका पोलीस कर्मचाऱ्याचा गणवेश परिधान केला होता आणि त्याच्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला होता. त्यामुळे आता संबंधित पोलीस कॉन्स्टेबलला पुढील चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.