Viral Video : जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) तैनात असलेल्या एका महिला जवानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ही महिला जवान २४ जुलै रोजी तिच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेची माहिती सांगत आहे. तिने आरोप केला की, काही व्यक्तींनी तिच्या घरामधून सोनं, रोख रक्कम आणि काही मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. या वस्तू आणि सोनं तिने तिच्या लग्नासाठी ठेवलं होतं.

दरम्यान, हा व्हिडीओ भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी एक्सवर शेअर केला असून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या घटनेचा योग्य तपास करून संबंधित महिलेल न्याय देण्याची मागणी केली आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा या महिलेचे कुटुंब घरी नव्हतं. याचा फायदा घेत दरोडेखोरांनी सुमारे २२ तोळे सोनं, काही महागड्या साड्या आणि ५० हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. मात्र, त्यानंतर जेव्हा कुटुंब घरी परतलं तेव्हा त्यांना घरी चोरी झाल्याची माहिती समजली.

त्यानंतर या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर ही महिला जवान व्हिडीओत धायमोकलून रडताना दिसत आहे. “हे सर्व सोनं माझ्या लग्नासाठी ठेवलं होतं. आता मी सर्व गमावलं. आता काय करायचं मला माहित नाही”, असं म्हणत ती ढसाढसा रडत असल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे.

या घटनेवरून भाजपा नेते के.अन्नामलाई यांनी एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार घणाघात केला. के.अन्नामलाई म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या देशाच्या सीमेवर सन्मानाने सेवा करणाऱ्या तामिळनाडूतील एका महिला जवानाच्या कटपाडीजवळील तिच्या घरामधून दागिन्यांच्या चोरी झाली. अशा प्रकारची घटना घडल्यानंतर कोणत्या प्रकारचं सरकार एखाद्या महिलेला खांद्यावर राष्ट्राचा ध्वज घेऊन न्यायाची भीक मागण्यास भाग पाडतं आहे? मग हेच या सरकारचं मॉडेल आहे का? जिथे गुन्हेगार मुक्तपणे फिरतात आणि आपल्या देशाचे रक्षक मदतीसाठी याचना करतात”, अशी टीका के.अन्नामलाई यांनी केली आहे.

पोलिसांनी काय म्हटलं?

दरम्यान, या महिला जवानाच्या घरी घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी म्हटलं की, “घरात चोरी झालेल्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. तक्रारदारांनी २४ जुलै रोजी पोलिसांशी संपर्क साधला होता. पण गुन्ह्याच्या ठिकाणी कोणतंही सीसीटीव्ही नसल्यामुळे फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळाचं विश्लेषण करत आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस इतर काही गुन्हेगारांचीही चौकशी करत आहेत.”