प्रायोगिक तत्वावर तयार करण्यात आलेलं एक च्युईंग गम आता करोना संसर्गापासून लोकांचा बचाव करु शकतं असा दावा वैज्ञानिकांनी केलाय. हे च्युईंग गम तोंडामधील करोना पार्टीकल्सचा ट्रॅप करतं असं सांगण्यात आलं आहे. तोंडामधील ९५ टक्के करोना पार्टीकल्स या च्युईंग गमच्या माध्यमाने ट्रॅप होऊ शकतात आणि त्या माध्यमातून करोनाचा फैलाव रोखता येतो असं सांगण्यात आलं आहे.

एका अभ्यासानुसार हे च्युईंग गम एखाद्या जाळीप्रमाणे काम करतं. जाळीच्या मदतीने ज्यापद्धतीने एखादी गोष्टी पकडतात त्याच पद्धतीने हे च्युईंग गम करोना पार्टिकल्स पकडेल. या च्युईंग गमच्या मदतीने थुंकीमधील करोना पार्टिकल्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे. असं केल्याने करोनाचा संसर्ग होण्यापासून वाचवता येऊ शकतो. संसर्ग झालेली व्यक्ती जेव्हा बोलतात, श्वास घेतात किंवा खोकतात तेव्हा अशावेळी त्यांच्या तोंडामधून बाहेर पडणाऱ्या ड्रॉपलेट्सच्या (हवेच्या माध्यमातून प्रसार होऊ शकतील असे तोंडातील, नाकातील द्रव्याचे छोटे थेंबांच्या) माध्यमातून करोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. मात्र या च्युईंग गममुळे या अशापद्धतीच्या संसर्गावर नियंत्रण मिळवता येऊ शकते असा दावा करण्यात आलाय.

या विशेष च्युईंग गममध्ये एसीईटू प्रोटीनचे काही घटक आहेत. हे प्रोटीन्स शरीरामधील पेशींच्या पृष्ठभागावर आढळतात. विषाणू पेशींना संसर्ग करतात. मात्र या नवीन च्युईंग गमसंदर्भातील संशोधनामध्ये असं दिसून आलं की विषाणूंचा संसर्ग होण्यासाठी कारणीभूत असणारे घटक या च्युईंग गममधील एसीईटूला चिकटतात. यामुळे विषाणूंचा व्हायरल लोड म्हणजेच संसर्ग होण्याची क्षमता कमी होते. च्युईंग गम चावून त्याची चाचणी करण्यात आली तेव्हा त्यामधील व्हायरल लोड हा ९५ टक्क्यांनी कमी असल्याचं दिसून आलं.

पेनसिल्व्हेनिया विद्यापिठातील एका संशोधकांच्या गटाने मॉलिक्युलर थेरपीच्या अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार या च्युईंग गमची चव सर्वसामान्य च्युईंग गम प्रमाणेच आहे. समान्य तापमानाला म्हणजेच रुम टेम्पेरचरमध्ये हे च्युईंग गम ठेवता येईल. या च्युईंग गममधील एसीईटू प्रोटीन मॉलिक्युल्सवर सामान्य तपामानाचा फारसा परिणाम होत नाही.

हे च्युईंग गम वापरल्याने थुंकीच्या माध्यमातून पसरणाऱ्या करोना विषाणूंवर नियंत्रण मिळवता येणार आहे. याबरोबरच करोना लसीकरण संसर्ग रोखण्यासाठी फायद्याचं आहे असं संशोधक सांगतात. मात्र जिथे अद्याप करोनाच्या लसी उपलब्ध झालेल्या नाहीत अशा देशांमध्ये हे च्युईंग गम चांगला पर्याय ठरु शकतं असं सांगण्यात आलंय.