Rahul Gandhi On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज (६ ऑगस्ट) भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली. त्यामुळे अमेरिकेचा हा निर्णय भारतासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारं एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचलं आहे. त्यामुळे भारताला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे आर्थिक ब्लॅकमेलिंग असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादल्यानंतर काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे. राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला आर्थिक ब्लॅकमेलिंग म्हटलं आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के आयातशुल्क लादणं म्हणजे हे आर्थिक ब्लॅकमेलिंग आहे. भारताला एका अन्यायी व्यापार करारात अडकवण्याचा हा प्रयत्न आहे”, असं राहुल गांधींनी म्हटलं. तसेच यावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक सल्लाही दिला आहे. ‘पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कमकुवतपणाला भारतीय लोकांच्या हितापेक्षा जास्त महत्त्व देऊ नये’, असा टोलाही राहुल गांधींनी लागवला आहे.

भारताचं अमेरिकेला सडेतोड उत्तर

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “इतर अनेक देशांनी स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृतींसाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही पुन्हा सांगतो की ही कृती अन्यायकारक आणि अवास्तव आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलेल”, असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं.

भारतावरील आयातशुल्क आता ५० टक्क्यांवर

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केल्यामुळे आता अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचलं आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली असून अमेरिकेत भारतीय वस्तू महागणार आहेत. याचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.