छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव दलाचे नऊ जवान दोन दिवसांपूर्वी शहीद झाले. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार गुप्तचर खात्यानं असा हल्ला होणार असल्याची पूर्वसूचना अनेकवेळा दिली होती. राज्याच्या गुप्तचर खात्याने पडोली या थेट ठिकाणाचा उल्लेख करून बस्तर परीसरामध्ये वाहनं शक्यतो वापरू नयेत, नक्षली हल्ला करण्याच्या तयारीत आहेत अशी पत्रं लिहिली होती.

गुप्तचर खात्याने 18 फेब्रुवारी रोजी बस्तरमधल्या केंद्रीय राखीव दलाच्या अधिकाऱ्यांना तसेच पोलिस अधिकाऱ्यांना सावध केलं होतं. “गेल्या दोन दिवसांपासून तेलंगणाचे सव्वाश ते दीडशे नक्षली सकलेर व गुदराई या गावांदरम्यान आले आहेत. पलोडी इथल्या कँपची रोजच्या रोज माहिती काढण्याची कामगिरी त्यांच्यापैकी काहीजणांना दिलेली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, पलोडी कँपमधल्या सुरक्षा दलावर हल्ला करण्याची योजना आखली जात आहे. योग्य ती पावले उचलावीत. तातडीच्या कारवाईची गरज आहे.” इतक्या स्पष्ट शब्दांमध्ये गुप्तचर खात्यानं या हल्ल्याची कल्पना दिली होती. हे वृत्त खरं असेल तर सीआरपीएफ व पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली असती तर नऊ जवानांचे प्राण वाचले असतेच, शिवाय मोठ्या संख्येनं नक्षलींचा नि:पात करता आला असता.

दुसऱ्या एका पत्राचा मथळाच पलोडी कँप आहे नक्षलींचे लक्ष्य असा आहे. दक्षिण सुकमाच्या क्षेत्रात पलोडी कँपवर नक्षलींची हल्ल्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.  यानंतर काही दिवसांमध्येच किस्तराम पलोडी भागामध्ये आयईडीचा स्फोट करून सीआरपीएफच्या जवानांची गाडी उडवण्यात आली, ज्यामध्ये नऊ जवानांनी प्राण गमावले.

अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला पलोडी कँप हा नक्षलींच्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. त्यामुळे या कँपच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करावी असा सल्लाही सीआरपीएफला व पोलिसांना देण्यात आला होता, तसेच हा कँप ठेवावा की हलवावा याचा विचार करण्याचेही सुचवण्यात आले होते.
इंडियन एक्स्प्रेसनं नमूद केलंय की किस्तराम व पलोडीच्या 10 किलोमीटरच्या त्रिज्येत नक्षलींचा वावर असल्याचे गेल्या तीन महिन्यांमध्ये सुमारे 45 वेळा गुप्तचर खात्याने कळवले होते. या नक्षलींमध्ये त्यांचे कमांडर रामण्णा, सावित्री, सोदी सुधाकर व नागेश यांचा समावेश असल्याचेही सूचित करण्यात आले होते. तर सीआरपीएफच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, दर काही दिवसांनी किस्तरामसंदर्भात सुरक्षा अॅलक्ट येतात, काही दिवस काही घडलं नाही, की पुन्हा अॅलर्ट येतो. नक्षली त्यांच्या योजना बदलत राहतात, अशामुळे सुरक्षाविषयक अॅलर्ट्सकडे दुर्लक्ष होते असं तो म्हणाला.