सरसंघचालकांचे प्रतिपादन; सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ एकच

गाझियाबाद : झुंडबळीच्या गुन्ह्यत सामील असलेले लोक हिंदू नाहीत, ते हिंदुत्वविरोधी आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी केले. हिंदू-मुस्लीम वेगळे नाहीत, ते एक आहेत. सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ एकच आहे, असे भागवत म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील मुस्लीम राष्ट्रीय मंचने आयोजित केलेल्या ‘हिंदुस्थान फर्स्ट, हिंदुस्थानी बेस्ट’ या कार्यक्रमात भागवत बोलत होते. सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ सारखाच आहे. त्यामुळे ‘भारतात इस्लाम धोक्यात’ या भयचक्रात मुस्लीमांनी अडकू नये, असे आवाहनही त्यांनी केले. हिंदू-मुस्लीमांमधील संघर्षांवर विसंवाद नव्हे, तर संवाद हाच एकमेव उपाय आहे, असेही ते म्हणाले.

आपण लोकशाही देशात आहोत. त्यामुळे देशात हिंदू किंवा मुस्लीम यांचे वर्चस्व असू शकत नाही, तर देशात केवळ भारतीयांचेच वर्चस्व असले पाहिजे, असे भागवत यांनी सांगितले. ऐक्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. परंतु एकीचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचे संचित असले पाहिजे, असेही भागवत म्हणाले. लोकांमध्ये धर्मावरून भेदभाव केला जाऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

झुंडबळीच्या गुन्ह्य़ांत सामील असलेल्या हिंदूंबाबतही भागवत यांनी भूमिका स्पष्ट केली. झुंडबळी घेण्यात सामील असलेले लोक हिंदुत्वविरोधी आहेत. तथापि, झुंडबळीचे काही खोटे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

भाषणाच्या प्रारंभी भागवत यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्यामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘मी प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा मतपेढीच्या राजकारणासाठी या कार्यक्रमास आलेलो नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ना राजकारणात आहे ना त्याला प्रतिमा जपण्याची चिंता आहे. संघ देशाला मजबूत करण्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी काम करतो.’’

भागवत म्हणाले..

’झुंडबळी घेण्यात सामील असलेले लोक हिंदुत्वविरोधी आहेत. मात्र झुंडबळीचे काही खोटे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

’भारतात मुस्लीम व्यक्ती राहू शकत नाही, असे एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही.

’गाय हा पवित्र प्राणी आहे, परंतु जे इतरांचे झुंडबळी घेतात ते हिंदुत्वाविरोधी आहेत. त्यांच्यावर निष्पक्षपणे कायदेशीर कारवाई होईल.

’‘हिंदू-मुस्लीम ऐक्य’ हे दिशाभूल करणारे आहे, कारण हिंदू-मुस्लीम मूलत: एकच आहेत.

’आपण लोकशाही देशात आहोत. त्यामुळे देशात हिंदू किंवा मुस्लीम यांचे वर्चस्व असू शकत नाही.

’सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ सारखाच आहे. त्यामुळे ‘भारतात इस्लाम धोक्यात’ या भयचक्रात मुस्लीमांनी अडकू नये.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those indulging in lynching are against hindutva rss chief mohan bhagwat zws
First published on: 05-07-2021 at 02:04 IST