पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते जॉय बॅनर्जी यांनी शुक्रवारी जनतेला चिनी मालावर बंदी घालण्याचे आवहान केलं. इतकचं नाही तर चिनी वस्तू वापरणाऱ्यांना मारहाण करुन त्यांच्या घरी चोरीमारी करुन घरांचे नुकसान केलं पाहिजे अशी टोकाची भूमिकाही बॅनर्जी यांनी मांडली. भारत आणि चीन सीमेवर गालवान खोऱ्यात मागील आठवड्यात मंगळवारी म्हणजेच १५ जून रोजी झालेल्या हिंसेमध्ये २० जवान शहीद झाले. यानंतर चिनी मालावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच आता भाजपाच्या नेत्याने थेट चिनी माल वापरणाऱ्यांवर हल्ला करण्याचा अजब आवाहन केल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.

“चीनला आपण धडा शिकवला पाहिजे. या सर्वांची सुरवात आपण चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून करायला हवी. चीनमधून येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर आपण बहिष्कार टाकला पाहिजे. जे अजूनही चिनी वस्तू वापरत आहेत त्यांनी अशा वास्तूंचा वापर बंद केला पाहिजे. असं न केल्यास त्यांचे पाय तोडले पाहिजे आणि त्यांच्या घरांची लूटपाट केली पाहिजे,” असं बॅनर्जी म्हणाले.

बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आधी भाजपाने चीनसंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. “या संकट प्रसंगी आम्ही सर्वजण सरकारबरोबर आहोत. मात्र भाजपाच्या नेत्यांनी अशी वक्तव्य करण्याआधी केंद्रात असणाऱ्या पक्षाने चीन आपल्या भूभागामध्ये शिरलाच कसा याचे स्पष्टीकरण द्यावे. लोकांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकायचा असेल तर ते स्वइच्छेने टाकतील बहिष्कार. अशाप्रकारची वक्तव्य करण्याचा अधिकार भाजपाला कोणी दिला?,” असा प्रश्न तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने उपस्थित केला.