India-Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती असताना चंदीगड येथे सिव्हील डिफेन्स वॉलंटियर मोहिमेत सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण जमल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी केंद्रशासीत प्रदेश प्रशासनाने चंदीगडच्या टागोर थियटर येथे यासंबंधी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या ठिकाणी पोहोचण्यासाठी उमेदवारांना दुपारी १२.१५ वाजताची वेळ देण्यात आली होती, परंतु हजारो मुले-मुली सकाळी ८ वाजण्याच्या आधीच या ठिकाणी दाखल झाले होते.
येथे जमलेल्या तरुणांची संख्या इतकी जास्त होती की हजारो उमेदवारांना प्रशिक्षणासाठी चंदीगडच्या सेक्टर १७ येथील तिरंगा मैदानावर जाण्यास सांगण्यात आले .
यावेळी तरुणांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणात प्रथमोपचार तसेच सीपीआर देणे याबरोबरच जखमी व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणे, आग विझवण्याच्या पद्धती इत्यादीचा समावेश होता. तसेच या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना यावेळी त्यांच्या मदतीची आवश्यकता भासली तर केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून बोलावले जाईल असे सांगण्यात आले आहे.
यावेळी चंदीगड येथील तिरंगा मैदान हे वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणांनी भरून गेले होते. तसेच आयोजकांनी यावेळी “हाऊज द जोश?” असे विचारताच सहभागी झालेल्या उमेदवारांनी मोठ्याने “हाय सर” म्हणत प्रतिसाद दिला.
“आमचा जोश खूप हाय आहे,” असे चंदीगडचा रहिवासी असलेल्या २० वर्षीय वरुण शर्मा याने सांगितले, तो त्याच्या मित्रांसह टागोर थिएटर येथे आला होता. “आम्ही येथे प्रशासनाकडून प्रशिक्षण आणि पुढील जबाबदारी दिली जाईल असा विचार करून आलो होतो, परंतु आम्हाला फक्त सीपीआर, प्रथमोपचार इत्यादीचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले. आम्ही कुठेही तैनात होण्यास तयार आहोत,” असे वरुण शर्मा म्हणाला.
तर मोहाली येथून आलेली रंजना म्हणाली की, ती एनसीसीची सदस्य आहे आणि तिने काही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे मुलभूत प्रशिक्षण घेतलेले आहे. “मी आणि माझी मैत्रिण प्रिया सेक्टर ४९ मधून येथे सकाळी लवकर येथे आलो. आम्ही सर्टिफाइड एनसीसी कॅडेट आहोत. आम्हाला वाटलं की आम्हाला जबाबदारी दिली जाईल. पण काहीह असले तरी, आम्ही फॉर्ममध्ये आमचे फोन नंबर दिले आहेत आणि जेव्हा प्रशासनाला आवश्यकता असेल तेव्हा आम्ही हजर राहू,” असे तिने सांगितले.
दरम्यान आयोजन स्थळावर प्रचंड गर्दी झाल्याने अनेक तरुण उमेदवारांना त्यांचे अर्ज जमा करता आले नाहीत.
पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशाचे अॅडमिनिस्ट्रेटर गुलाब चंद कटारिया हे यावेळी तिरंगा मैदानावर उपस्थित होते, ते म्हणाले की, इतके तरुण सिव्हील डिफेन्स वॉलंटियर म्हणून देशाची सेवा करण्यास तयार आहेत हे पाहून त्यांना आनंद झाला. “मला चंदीगडच्या उपायुक्तांकडून सांगण्यात आलं की आज ३,००० तरुणांनी नोंदणी केली आहे. मी तुमच्या उत्साहाला सलाम करतो,” असे ते सहभागी झालेल्या तरुणांना संबोधित करताना म्हणाले.