जपानमधील फुकुशिमा अणुदुर्घटनेला उद्या (११ मार्च) तीन वर्षे पूर्ण होत असून या घटनेच्या पूर्वसंध्येला स्मृतिप्रीत्यर्थ टोकियो पार्क येथून ड्रम वाजवून ‘सायोनारा न्यूक्स’ची चिन्हे फडकावित संसदेवर मोर्चा काढण्यात आला. अणुऊर्जा बंद करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. जपानमध्ये अणुऊर्जेच्याविरोधात अनेक निषेध मेळावे झाले.
११ मार्च २०११ रोजी चेर्नोबिलनंतरची ती सर्वात भयानक अणुदुर्घटना घडली होती. ही घटना आम्ही कधीही विसरू शकणार नाही असे निदर्शकांनी सांगितले. जपानमधील सध्या बंद असलेल्या ४८ अणुभट्टय़ा सुरू करण्याच्या पंतप्रधान शिन्झो अॅबे यांच्या योजनेला विरोध करण्यात आला असून सरकारने अणुऊर्जेवरचे अवलंबित्व कमी करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या घटनेनंतर जपानची तेल आयात वाढली असून त्यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. निषेध मेळाव्यातील निवृत्त रेल्वे कामगार कात्सुतोशी सातो यांनी सांगितले की, नद्या प्रदूषित झाल्याने त्यातील माशांचे सेवन करणे धोकादायक बनले आहे.
निषेधाचे प्रमाण मोठे असून कुटुंबातील आबालवृद्ध या निदर्शनांमध्ये सामील होत आहेत. ‘द लास्ट एम्परर’ या चित्रपटासाठी ऑस्कर मिळालेले रूइची साकामोटो व नोबेल विजेते लेखक केनझाबुरो ओवे यांचाही त्यात सहभाग होता. फुकुशिमातील डाईइची प्रकल्पात स्फोट होऊन ११ मार्च २०११ रोजी तीन अणुभट्टय़ा वितळल्या होत्या व त्यातून किरणोत्सर्गी प्रारणे हवा व समुद्रात मिसळली होती. अणुभट्टी बंद करण्याची प्रक्रिया काही दशके चालणार आहे.
टोकियोतील भूकंपशास्त्रज्ञ रॉबर्ट गेलर यांनी सांगितले की, या घटनेला तीन वर्षे घडून गेली तरी ती घटना का घडली याचे स्पष्टीकरण कुणाला देता आले नाही व ती परत होणार नाही यासाठी काय करता येईल हेही सांगता येत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2014 रोजी प्रकाशित
फुकुशिमा स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये जोरदार निदर्शने
जपानमधील फुकुशिमा अणुदुर्घटनेला उद्या (११ मार्च) तीन वर्षे पूर्ण होत असून या घटनेच्या पूर्वसंध्येला स्मृतिप्रीत्यर्थ टोकियो पार्क येथून ड्रम वाजवून ‘सायोनारा न्यूक्स’ची चिन्हे फडकावित संसदेवर मोर्चा

First published on: 10-03-2014 at 02:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousands take part in anti nuclear protests ahead of fukushima anniversary