बिहारमधील भाजप नेते अविनाश कुमार यांच्या खूनप्रकरणी एका माजी नगरसेवकासह तीनजणांना अटक करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी राज्य विधानसभेत देण्यात आली.
भाजपचे स्थानिक नेते असलेले अविनाश कुमार यांचा सशस्त्र हल्लेखोरांनी गुरुवारी पाटण्यात खून केला होता. त्याबाबत निवेदन करताना गृहखात्याचे प्रभारी मंत्री विजय चौधरी यांनी तिघांच्या अटकेची माहिती दिली. विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव आणि भाजपच्या इतर आमदारांनी मात्र प्रभारी मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर आक्षेप घेऊन गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याबाबत निवेदन करण्याची मागणी केली.
सभागृहातील गोंधळामुळे काहीच ऐकू येत नसल्याने मंत्र्यांनी हे निवेदन सभागृहाच्या पटलावर ठेवले. पत्रकारांना देण्यात आलेल्या या निवेदनाच्या प्रतीमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कदमकुआँ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दलदली येथील घटनास्थळाजवळ असलेल्या एका मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी मिळवले असल्याचे त्यात म्हटले आहे.
माजी नगरसेवक पन्नालाल गुप्ता, त्याचा मुलगा दर्शन कुमार व मुलगी ज्योती गुप्ता या तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वातील पथक इतर आरोपींचा कसून शोध घेत आहे. कुमार यांचा खून करणाऱ्या तीन सशस्त्र हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजला व्यापक प्रसिद्धी दिली जात आहे.