Sambhal Shahi Jama Masjid : संभल येथील जामा मशि‍दीत हिंदू विधी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शुक्रवारी दिल्ली येथील तीन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हे तीन जण मशि‍दीच्या परिसरात हवन आणि पूजा करण्याचा प्रयत्न करत होते अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

यापूर्वीच शुक्रवारच्या प्रार्थनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

पोलीस अधीक्षक कृष्णा कुमार बिश्नोई यांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “तीन जण कारनेवादग्रस्त जागेजवळ आले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांना भविष्यात संभलमध्ये प्रवेश करू नये अशी ताकीद देखील देण्यात येईल,” असे बिश्नोई यांनी सांगितले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सनातन सिंग याने दावा केला की, “आम्ही विष्णू हरिहर मंदिरात हवन आणि यज्ञ करण्यासाठी आलो होतो, पण पोलिसांनी आम्हाला अटक केली. जर तिथे नमाज पठण करता येते, तर आम्ही पूजा का करू शकत नाही?”

तर दुसरा वीर सिंग यादव म्हणाला की, “आम्ही संभल मशिदीत विधी करण्यासाठी आलो होतो, पण पोलिसांनी आम्हाला रोखले.” तर तिसरा अनिल सिंग म्हणाला की, “आम्ही हरिहर मंदिरात हवन करण्यासाठी गेलो होते पण आम्हाला ताब्यात घेण्यात आले.”

मोहल्ला कोट गरवी येथे धार्मिक विधीमुळे तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल असे पोलिसांनी बजावले आहे.

यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या हिंसाचारात ४ लोकांचा मृत्यू झाला होता. कोर्टाने शाही जामा मशि‍दीच्या सर्व्हेक्षणाचे आदेश दिल्यानंतर स्थानिकांनी आंदोलन केले होते, ज्यानंतर हिंसाचार उसळला होता.

पाडलेल्या हिंदू मंदिराच्या जागेवर ही मशीद उभी असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान यानंतर झालेल्या हिंसाचारात सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अनेक लोक जखमी झाले होते, तेव्हापासून संभलमध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.