मारल्या गेलेल्या नक्षलींच्या स्मृतिप्रीत्यर्थ सध्या नक्षलवाद्यांकडून पाळण्यात येत असलेल्या ‘नक्षल आठवडय़ा’च्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत तीन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आह़े  छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त कोंडागाव जिल्ह्यात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली़  अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांपैकी एकावर ५ हजार रुपयांचे पारितोषिकही होत़े कच्रू मुरिया (२५) याला रेंगागोडनी, तर बिल्लू मुरिया आणि दशरथ नेतम (३५) यांना केजंग या त्यांच्या गावातून अटक करण्यात आली़  
राष्ट्रपती उद्या तेलंगणमध्ये
नवी दिल्ली : येत्या शनिवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तेलंगणच्या दौऱ्यावर जात आहेत. शमीरपेठ येथील ‘नालसार’ विधी विद्यापीठाच्या १२व्या पदवीदान समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. २ जून रोजी अस्तित्वात आलेल्या तेलंगण राज्यातील राष्ट्रपतींची ही पहिलीच भेट आहे. दोनदिवसीय भेटीत राष्ट्रपती पश्चिम बंगाल आणि तेलंगणमधील कार्यक्रमांना उपस्थित राहतील.
ढगफुटीत पाच ठार
डेहराडून : उत्तराखंडमधील तेहरी जिल्ह्यातील नेताड गावात गुरुवारी ढगफुटी झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. ढगफुटीमुळे पहाटे २.३० वाजल्यापासून तब्बल दोन तास या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे या गावातील ओढय़ाला पूर आला होता आणि त्याचे पाणी गावात शिरले होते. त्यामुळे घरे कोसळून चार महिलांसह पाच जणांना जीव गमवावा लागला. घरे कोसळली त्या वेळी सर्व जण गाढ झोपेत होते. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बोट बुडून २५ मृत्युमुखी
जाकार्ता : इंडोनेशियात बोट बुडून झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये २५ जण मृत्युमुखी पडले. यात सहा बालकांचा समावेश आहे, तर १३ जण बेपत्ता असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. ईद साजरी करण्यासाठी हे सर्व जण जात असताना ही घटना घडली. इंडोनेशिया हा जगातील मुस्लीमबहुल देश आहे. रमजानच्या पवित्र महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात ईद साजरी करण्यासाठी शहरातील मुस्लीम नागरिक मोठय़ा प्रमाणावर गावांकडे येतात. दुर्घटनाग्रस्त बोटीत या वेळी ४८ लोक प्रवास करीत होते.
मौलवीकडून माफी
कौलालम्पूर : पाच वर्षांपूर्वी मलेशियातील हिंदूंविषयी अवमानजनक उद्गार काढल्याबद्दल भारतीय वंशाच्या मौलवीने गुरुवारी माफी मागितली. हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल मौलवीने माफी मागावी, अशी मागणी करत येथील हिंदू समुदायाने निषेध मोर्चा काढला होता. उस्ताद शाहुल हमीद मोहम्मद (३९) असे या मौलवीचे नाव आहे. हिंदू व्यापाऱ्यांकडून मसाल्याचे पदार्थ विकत घेऊ नका, अशी सूचना मोहम्मद याने येथील मुस्लिमांना केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनक्षलNaxal
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three naxal arrested in raipur
First published on: 01-08-2014 at 02:11 IST