नागा दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत तर तीन जण जखमी झाले आहेत. अरुणाचल प्रदेशातील खोंसा जिल्ह्य़ानजीक तोपीनगर येथे ही घटना घडली. जखमी जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लष्कराच्या चार गाडय़ा गुरुवारी आसामातील दिनजान या तळावरून अरुणाचलमधील लाँजिंग येथील तळावर जात होत्या. या मार्गावर दबा धरून बसलेल्या नागा दहशतवाद्यांनी गुरुवारी सकाळी लष्कराच्या वाहनांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जवान शहीद झाले तर अन्य तिघे जखमी झाले. लष्करानेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवादी जंगल भागात पसार झाले. अरुणाचल प्रदेशात नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅण्ड (एनएससीएन) या दहशतवादी संघटनेचे प्राबल्य असून या संघटनेतही खापलांग आणि आयझ्ॉक-मुइवा असे दोन गट आहेत. अरुणाचलातील चांगलांग, तिरप आणि लाँजिंग या तीन जिल्ह्य़ांमध्ये या गटांचे प्राबल्य आहे. हे तीनही जिल्हे म्यानमारला लागून असल्याने अनेकदा हे गट हिंसक कारवाया करून म्यानमारमध्ये आश्रय घेतात. परस्परांवर हल्ले चढवतानाच हे दोन्ही गट सुरक्षा दलांनाही लक्ष्य करीत असतात. त्यातूनच गुरुवारी हल्ला झाला असावा असा कयास आहे. एनएससीएन (आय-एम) गटाने १९९७ मध्ये तर एनएससीएन (के) गटाने २००१ मध्ये युद्धबंदी पुकारली होती.