पंजाब येथील संगरुर जिल्ह्यात असलेल्या भवानीगढ गावात हेड कॉन्स्टेबल सतपाल सिंग यांच्यावर वाहतूक पोलीस म्हणून काम करण्याची वेळ आली आहे.  त्यांचा गणवेश पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की सतपाल सिंग हे नेहमी आपण पाहतो तसे ट्रॅफिक हवालदार नाहीत. सतपाल सिंग यांच्या गणवेशावर चार पदकं आहेत. या पदकांपैकी एक पदक अर्ध निळं आणि अर्ध नारंगी रंगाचं आहे. याचाच अर्थ त्यांना वीर चक्र प्रदान करण्यात आलं आहे. कारगिल युद्धात शौर्य दाखवणाऱ्या या जवानावर आज ट्रॅफिक पोलिसाचं काम करण्याची वेळ आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वीस वर्षांपूर्वी सतपाल सिंग हे भारतीय लष्करात कार्यरत होते. सतपाल सिंग यांचा कारगिल युद्धात सहभागही होता. नॉर्दन लाइट इन्फेट्रीचे कॅप्टन शेर खान यांच्यासह तिघांचा त्यांनी खात्मा केला होता. सतपाल सिंग हे ८ शिख पथकात सहभागी झाले होते. ज्यामध्ये दोन अधिकारी, चार जेसीओ तर ४६ इतर अधिकारी होते. १९ ग्रेनेडियर्सना टायगर हिल्सवर कब्जा करण्यासाठी सहकार्य करा असे सांगण्यात आलं. टायगर हिलवर झालेल्या भीषण लढाईत तीन जेसीओंसह ८ शिपाई शहीद झाले. जे वाचले त्यापैकी अनेकजण जखमी झाले होते. या पथकात शौर्य दाखवणाऱ्या जवानांनामध्ये सतपाल सिंग यांचा समावेश होता.

सतपाल सिंग आता ४६ वर्षांचे आहेत, कारगिल युद्धाच्या आठवणी ते सांगतात. आम्ही ५ जुलै १९९९ आम्ही पोजिशन घेतली होती. आम्हाला दिलेला चहा थंडगार होता, आमच्या अंगावर गणवेश होता. आता थंडीचा सामना करण्यासाठी उबदार कपडे घेऊन जायचे की दारुगोळा? आम्हाला एकच पर्याय निवडायचा होता. मात्र आमचा निर्णय ठरला होता आम्ही शक्य तेवढा दारु गोळा आणि हत्यारं घेऊन निघालो. भारतीय लष्कराच्या तुकडीला मागे सारण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून ७ जुलै रोजी काऊंटर हल्ला करण्यात आला. ते एकापाठोपाठ हल्ले करत होते, आम्ही एक एक करुन त्यांना संपवायला सुरुवात केली. पाकिस्तानी सैन्याकडे एक चांगला अधिकारी होता जो त्याचे नेतृत्त्व करत होता. जेव्हा हल्ले होत होत होते त्या हल्ल्यामध्ये मीपण जखमी झालो होतो असेही सतपाल यांनी सांगितले.

एकवेळ अशी आली की बंदुकीत फक्त चारच राऊंड उरले होते. त्यानंतर बंदुकीशिवाय लढण्याची म्हणजेच मल्ल युद्ध करण्याची वेळ आमच्यावर आली. लढाई सुरु झाली होती, एक उंच धिप्पाड अधिकारी पाकिस्तानी सैनिकांना सूचना देत होता. दोन्हीकडून मल्ल युद्ध सुरु झालं. मी देखील तिघांना ठार केलं. त्यापैकी एकजण शेरखान आहे हे मला ठाऊक नव्हतं असंही सतपाल यांनी सांगितलं. २००९ मध्ये मी सेवानिवृत्त झालो. त्यानंतर मी पंजाब वाहतूक पोलीस खात्यात रुजू झालो. मी सध्या हेड कॉन्स्टेबल आहे. आपल्या देशात जेव्हा खेळाडू मेडल जिंकतात तेव्हा त्यांना चांगल्या पदावरची नोकरी दिली जाते. मी ज्या शेरखानला ठार केलं त्याचा पाकिस्तानने गौरव केला होता, तो त्यांचा एक उच्च अधिकारी होता. मला वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र निवृत्तीनंतर नोकरी मात्र उच्चपदावरची मिळाली नाही याची खंत माझ्या मनात आहे. आता मी माझ्या पोस्ट ग्रॅज्युएट मुलासाठी नोकरी मिळेल यासाठी प्रयत्न करतो आहे असेही सतपाल सिंग सांगतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger hill vir chakra now directs traffic in a small punjab town scj
First published on: 26-07-2019 at 13:19 IST