पीटीआय, जम्मू : पाकिस्तानातून घुसखोरी करून आलेले जैश-ए-मोहम्मदचे दोन आत्मघातकी बाँबर व सुरक्षादले यांच्यात जोरदार चकमक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीच्या भेटीच्या आदल्या दिवशी जम्मू व काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

 जम्मूच्या सीमेवर असलेल्या सुंजवान लष्करी तळानजिक शुक्रवारी झालेल्या चकमकीनंतर या केंद्रशासित प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. आत्मघातकी कंबरपट्टे घातलेल्या आणि मोठय़ा प्रमाणावर शस्त्रे व दारूगोळा बाळगणाऱ्या या दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्यामुळे एक मोठा हल्ला टळला होता.  या दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी निमलष्करी दलांच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या एका बसवर हल्ला केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्यांना कंठस्नान घातले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) एक अधिकारी या चकमकीत शहीद झाला, तर दोन पोलिसांसह ९ जण जखमी झाले.

जम्मू शहरापासून १७ किलोमीटवर असलेली पल्ली पंचायत अक्षरश: सील करण्यात आली आहे. कडक पहारा ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्यासह निमलष्करी दले मोठय़ा संख्येत तैनात करण्यात आली आहेत.  संयुक्त सुरक्षा पथके शनिवारी महामार्गाशेजारच्या बडी ब्राह्मण येथून पल्ली चौकापर्यंत गस्त घालताना दिसत होती. या मार्गावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भलेमोठे होर्डिग्ज लावण्यात आले आहेत.

एनआयए प्रमुखांची चकमकस्थळाला भेट

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) प्रमुख कुलदीप सिंह यांनी शनिवारी सुंजवान भागाला भेट दिली. सीआरपीएफचे जम्मू सेक्टरचे महानिरीक्षक पी.एस. रणपिसे हेही त्यांच्यासोबत होते. सीआरपीएफचे महासंचालकही असलेले कुलदीप सिंह यांना या दलाच्या अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांना मारण्यासाठी केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एनआयएच्या एका पथकाने शुक्रवारी सायंकाळी चकमक स्थळाला भेट दिली होती आणि सखोल तपासासाठी हे प्रकरण ही यंत्रणा आपल्याकडे घेण्याची शक्यता आहे, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर मोदींची जम्मूत पहिलीच सभा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जम्मू- पठाणकोट महामार्गापासून फक्त ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्यक्रमस्थळी पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी सुरक्षाव्यवस्थेचा भाग म्हणून सर्वसामान्य लोकांना प्रवेशासाठी मनाई करण्यात आली आहे. जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द करण्यात येऊन पूर्वीच्या राज्याचे विभाजन करण्यात आल्यानंतर पंतप्रधानांची येथे होणारी ही पहिलीच सभा आहे. जाहीर सभास्थळी ३० हजारांहून अधिक पंचायत सदस्यांसह १ लाखाहून अधिक लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.