देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये भाजपा विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा उभा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही दिवसांत भाजपावर टीका करण्याचं सत्र सुरू केलं असतानाच ‘एक बिहारी सौ बिमारी’ हे वाक्य सध्या बिहारमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचंड व्हायरल आणि चर्चेत येऊ लागलं आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार मनोरंजन व्यापारी यांनी हे विधान केल्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून त्यानंतर लगेच व्यापारी यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं काय?

मनोरंजन व्यापारी यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोलकात्यामध्ये एका पुस्तक मेळाव्यात बोलताना व्यापारी यांनी “एक बिहारी, सौ बिमारी” असं विधान केलं. यावेळी त्यांनी “जर बंगाली रक्त तुमच्या रक्तवाहिनीत धावत असेल, खुदीराम आणि नेताजी यांचे रक्त तुमच्या नसांमध्ये वाहत असेल आणि जर तुम्हाला तुमच्या मातृभाषेवर आणि मातृभूमीवर प्रेम असेल तर तुम्हाला ही घोषणा द्यावी लागेल. मोठ्याने ओरडावे लागेल. आम्हाला आजार नको आहेत. बंगाल रोगमुक्त करा. जय बांगला, जय दीदी ममता बॅनर्जी”, असं देखील ते म्हणाले.

पश्चिम बंगालमधील भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी हा व्हिडीओ ट्वीट करून मनोरंजन व्यापारी यांच्यावर निशाणा साधला. “आधी त्यांच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी बिहारी आणि उत्तर प्रदेशमधील नेतेमंडळींना बोहिरागोटो(अर्थात बाहेरचे) असं म्हटलं होतं. आणि आता हे म्हणतायत बंगालला बिहारींपासून मुक्त करा”, असं अधिकारी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते.

“एक बिहारी सौ बिमारी”; ममता बॅनर्जींच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनोरंजन व्यापारी यांनी घुमजाव केलं आहे. “बांगला भाषा, साहित्य-संस्कृतीबद्दल वाईट बोलणाऱ्यांविषयी मी बोललो. विशिष्ट समुदायाविषयी मी बोललो नाही. बिहारी माणसाला मी काहीही बोललेलो नाही”, अशी सारवासारव व्यापारी यांनी केली आहे. “भाषा चेतना समितीच्या बैठकीमध्ये लोक मला बंगाली भाषा बोलतो म्हणून बांगलादेशला पाठवण्याची भाषा करत होते. मग त्याला मी उत्तर द्यायला नको का?” असा सवाल देखील व्यापारी यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc mla manoranjan vyapari on viral video ek bihari sau bimari pmw
First published on: 15-03-2022 at 19:39 IST