सॉलिसिटर जनरलविरुद्ध तृणमूलची पंतप्रधानांकडे तक्रार

कोलकाता, नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेन्दू अधिकारी यांची दिल्लीत भेट घेतल्याबद्दल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

भाजपचे आमदार अधिकारी हे नारद आणि शारदा घोटाळ्यातील आरोपी आहेत आणि या प्रकरणांचा तपास सुरू आहे, त्यामुळे अधिकारी आणि मेहता यांची भेट होणे औचित्याला धरून नाही, असे तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन, सुखेन्दू शेखर रॉय आणि महुआ मैत्रा यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

दरम्यान, तुषार मेहता यांनी याप्रकरणी खुलासा केला असून आपली आणि अधिकारी यांची ही कथित भेट प्रत्यक्षात झालीच नाही, असा दावा केला आहे. सुवेन्दू अधिकारी हे कोणतीही पूर्वकल्पना न देता आपली भेट घेण्यासाठी आपल्या निवासस्थान वजा कार्यालयात आले होते. त्या वेळी आपण एका कार्यालयीन बैठकीत असल्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांनी सुवेन्दू यांना बाहेर बसवून ठेवले. बैठक संपल्यावर कर्मचाऱ्यांनी सुवेन्दू यांच्या आगमनाची आपणास माहिती दिली, पण आपण त्यांना भेटण्यास नकार दिला.  कर्मचाऱ्यांनी सुवेंदू यांना चहा दिला आणि मी त्यांना भेटू शकणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर सुवेंदू तेथून निघून गेले, असे  मेहता यांनी स्पष्ट केले. सुवेंदू यांना आपण भेटलोच नाही, त्यामुळे औचित्यभंग झालेला नाही, असे मेहता म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम बंगाल विधानसभेत गदारोळ

राज्यात निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचाराचा अभिभाषणामध्ये उल्लेख नसल्याचे आढळल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सभागृहात जोरदार गदारोळ माजविला त्यामुळे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांना आपले अभिभाषण आटोपते घ्यावे लागले आणि ते सभागृहातून निघून गेले. निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात बळी पडलेल्यांची छायाचित्रे आणि फलको दाखवत भाजपच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.