मतदान यंत्रांची विश्वासार्हता, हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून नेहमीच चर्चेत राहिला आहे. या मुद्द्यावरून सर्वच सत्ताधाऱ्यांनी समर्थनाची बाजू मांडली असताना सर्वच विरोधी पक्षांनी या यंत्रणांना विरोध केला आहे. जे पराभूत होतात, तेच मतदान यंत्रांना विरोध करतात असं देखील म्हटलं गेलं. पण घोटाळा मतदान यंत्रामध्ये न होता मतदान केंद्रावर होत असल्याचा एक प्रकार नुकताच समोर आला आहे. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये मतदान केंद्रावर मतदार सोडून भलतीच व्यक्ती मतदान यंत्रावरील बटण दाबत आहे. हा व्हिडिओ ट्वीट करून तृणमूल काँग्रेसनं या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ त्रिपुरामध्ये सुरू असलेल्या स्थानिक निवडणुकांमधला असल्याचं सांगितलं जात आहे. गुरुवारी सकाळपासूनच त्रिपुरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात झाली. याच मतदान प्रक्रियेदरम्यान, त्रिपुरातील एएमसी वॉर्ड क्रमांक १३मधील एक व्हिडीओ तृणमूल काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. तसेच, या एकूणच निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

या व्हिडीओमध्ये संबंधित मतदान केंद्रावर एक काळा शर्ट घातलेला तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसत आहे. एक महिला मतदार यादरम्यान मतदान करण्यासाठी यंत्राजवळ गेल्यानंतर हा काळ्या रंगाचा शर्ट घातलेला तरुण तिथे जातो आणि यंत्रावरचं बटण दाबतो असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीने हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे, त्या व्यक्तीकडे देखील हा तरुण आला असताना त्याला वेळीच नकार देऊन परत पाठवलं गेलं.

तृणमूल काँग्रेसनं घेतला आक्षेप

हा व्हिडीओ ट्वीट करून तृणमूल काँग्रेसनं तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. “मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवलं जायला हवं की नाही? आगरताळामधील मुक्त वातावरणातील निवडणुका एक विनोद होऊन बसल्या आहेत. आगरताळा महानगर पालिका वॉर्ड क्रमांक १३मधल्या एका मतदान केंद्रावरचा हा व्हिडीओ पाहा”, असं तृणमूलनं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.