पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवरील अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानासाठी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आता मुंबई आयआयटीची मदत घेणार आहे. सीमा रेषेवर लेझर भिंत आणि बोगद्यांचा शोध घेण्यासाठी स्मार्ट सेन्सर्सचा वापर केला जाणार असून यासाठी बीएसएफ लवकरच मुंबई आयआयटीसोबत सामंजस्य करार करणार आहे.

केंद्र सरकारने सीमा रेषेवरील सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी एकीकृत सीमा व्यवस्थापन यंत्रणा (सीआयबीएमएस) राबवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भारत- पाक सीमा रेषा आणि भारत- बांगलादेश सीमा रेषेवरील सुरक्षा व्यवस्थेला मजबूत करुन घुसखोरी, तस्करीवर लगाम लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी सरकार ८ जुलैरोजी आयआयटी मुंबईसोबत सामंजस्य करार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीमा रेषेवरील अतिदुर्गम भागात तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असून यासाठी लागणारी उपकरणे आणि यंत्रणा तयार करण्यासाठी मुंबई आयआयटीची मदत घेतली जाईल. विशेषत: भारत- पाक सीमेवर वाळवंटापासून ते सियाचीनसारख्या बर्फाच्छादित भागात सैन्याचे जवान तैनात असतात. अशा प्रतिकूल हवामानात गस्त घालताना अडचणीही येतात. याशिवाय भारत- पाक सीमारेषेवर भुयारं सापडली होती. या भुयारांचा वापर घुसखोरीसाठी व्हायचा. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. या कामात मुंबई आयआयटी बीएसएफची मदत करणार आहे.

हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत-पाक सीमेवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. भारत-पाक सीमेवरील ४० ठिकाणे अशी आहेत की जिथे कोणतीही भिंत नाही. तर काही ठिकाणी संरक्षक भिंत उभारणेही अवघड आहे. पठाणकोट हल्ल्यानंतर अशा सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांवर भिंत उभारण्याची निकड भासू लागली होती.