तंबाखूमुळे उत्तम अन्नपचन होते.. सतत धूम्रपान करूनही दीर्घायुष्य लाभलेले अनेक जण आहेत.. वगैरे बेताल वक्तव्य करत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची भलामण करून केंद्र सरकारला अडचणीत आणणारे दिलीप गांधी, श्यामचरण गुप्ता आणि रामप्रसाद सरमाह या खासदारत्रिकुटावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या तिघांचीही मते खोडून काढत माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी तंबाखू निव्वळ प्राणघातकच असल्याचे स्पष्ट केले आहे.
सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादन कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून त्यात सुधारणा सुचवण्यासाठी दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या संसदीय समितीने सादर केलेल्या अहवालात तंबाखूमुळे कर्करोग होत नाही, असे स्पष्ट केले होते. त्यांच्या या अहवालामुळे वाद निर्माण झाला असतानाच गांधी यांनी तंबाखूमुळे अन्नपचन होत असल्याचे अजब तर्कट मांडले. त्यातच श्यामचरण गुप्ता आणि सरमाह यांनीही धूम्रपान करूनही दीर्घायुष्य लाभलेल्या अनेक व्यक्ती आहेत असा दावा केला होता. या सर्व पाश्र्वभूमीवर येथे सुरू असलेल्या एका कार्यक्रमात हर्षवर्धन यांना यासंदर्भात विचारले असता तंबाखू ही प्राणघातकच असल्याचे ते म्हणाले. एक वैद्यकीय तज्ज्ञ आणि माजी आरोग्य मंत्री या नात्याने आपण हे सांगत असल्याचे ते म्हणाले. हर्षवर्धन आरोग्यमंत्रिपदी असतानाच संबंधित कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना झाली होती. तंबाखूजन्य पदार्थावरील वेष्टनावर वैधानिक इशारा देणारा मजकूर ८५ टक्के असावा अशी शिफारस त्यांच्या समितीने केली होती.
हितसंबंध संघर्ष?
गांधी, गुप्ता व सरमाह यांनी हितसंबंध संघर्षांतून (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) तंबाखूविषयी बेताल विधाने केली असल्याचे निष्पन्न झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनीही हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. श्यामचरण गुप्ता यांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याचे समजते. मात्र, समितीतून आपली गच्छंती झाल्याचे कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाने आदेश दिल्यास आपण या समितीतून बाहेर पडू असेही ते म्हणाले.
शरद पवार यांचा इशारा
‘तंबाखू’बाबतच्या वादावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार भावुक झाले. ते म्हणाले, मी गुटखा खात होतो, त्याचे परिणाम मी भोगले आहेत. मला शस्त्रक्रिया करावी लागली, सगळे दात काढावे लागले. वेळीच हे उपचार केल्याने पुढचा धोका टळला. मात्र नगरचे लोकप्रतिनिधी तंबाखूचे समर्थन करीत असतील तर याबाबत आमचे ज्ञान अपुरे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांना चांगली माहिती असावी, असा टोला मारून मात्र हा विषय संसदेत चर्चेला येईल, तेव्हा दोन्ही सभागृहांत या अहवालाची चिरफाड करू, असे पवार म्हणाले.