सध्याचा टप्पा हा भारताच्या संविधानामधील राष्ट्रवाद गुंडाळून ठेवण्याचा टप्पा असल्याचं मत जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांनी व्यक्त केलं आहे. भारताच्या संविधानामध्ये जो सर्व समावेशक आणि विकासाचा विचार करणारा राष्ट्रवाद आहे त्यामधील महत्वाच्या गोष्टी वगळून सध्या धर्माच्या आधारावर राष्ट्राची व्याख्या तयार केली जात असल्याचं पळशीकर म्हणाले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त थिंक बँक या युट्यूब चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पळशीकर यांनी आपली मत मांडली आहेत.

“भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा अगदी १९ व्या शतकापासूनचा विकास जर पाहिला तर तो राष्ट्रवाद हा मानवतावादी आणि लोकशाहीवादी असेल. त्याही पलीकडे जाऊन हा राष्ट्रवाद सर्वसमावेशक असेल, या तीन गोष्टी त्यामध्ये कायम होत्या. आता तुम्ही त्या जर सोडून दिल्या तर जो राष्ट्रवाद उरतो तो आक्रमक, लोकांना वगळणारा आणि म्हणून धर्माच्या आधारावर राष्ट्राची व्याख्या करु पाहणारा आणि कर्कश्श स्वरुपाचा राष्ट्रवाद बनतो. नेहरु काय, गांधी काय आणि टागोर काय यांना राष्ट्रवादी नसेल म्हणायचं तर कोणाला म्हणायचं असा प्रश्न आहे,” असं पळशीकर म्हणतात.

“राष्ट्राच्या मुद्द्यावरुन या तिघांचेही मतभेद होते. पण त्यांच्या तिघांच्याही राष्ट्रवादात ही कल्पना होती की भारताचा राष्ट्रवाद हा लोकशाहीचा, लोकांचा असेल आणि यामध्ये कोणालाही वगळलं जाणार नाही. याला औपचारिक आधार म्हणून याला जे उत्तर शोधण्यात आलं ते होतं संविधान. हा संविधानात्मक राष्ट्रवाद यातून उदयाला यायला पाहिजे. संविधानाची उद्देश पत्रिका हाच राष्ट्रवाद सांगते. आम्ही भारताचे लोक आम्हा सर्वांसाठी हे सर्व करायला तयार आहोत, ही जी उद्देश पत्रिकेतील प्रतिज्ञा आहे ती आपल्या संविधानिक राष्ट्रवादाचं निवेदन आहे. ते सोडून देऊन त्याची जागा आता कोण आपल्या राष्ट्रात समाविष्ट होत नाही, कोण कोणाविरोधात बोलतं आणि म्हणून तो राष्ट्रविरोधी आहे या कल्पनांनी घ्यायला लागलो तर मला असं वाटतं की होय निश्चितपणे भारताच्या राष्ट्रवादाची आजची जी कल्पना प्रचिलित होतेय ती आणि १०० वर्षांच्या इतिसाहात राष्ट्रवादी चवळवळीने आणि संविधानाने तयार केलेला राष्ट्रवाद यात विसंगती तयार होते,” असं पळशीकर म्हणाले आहेत.

प्रजासत्ताक गुंडळण्याचा प्रयत्न…
“एका अर्थाने आताचा जो टप्पा आहे, म्हणजेच गेल्या पाच दहा वर्षांचा टप्पा हा भारताचं १९५० साली प्रस्थापित झालेलं जे प्रजासत्ताक आहे ते गुंडाळण्याचा, त्याच्या समाप्तीचा टप्पा आहे. ही दुर्देवाची गोष्ट आहे की, भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमोहोत्सवाच्या ट्प्प्यावरतीच नेमकं भारताचं संविधानिक प्रजासत्ताक हे भावनिक दृष्ट्या गुंडाळून ठेवलं जात आहे,” अशी खंत पळशीकर यांनी व्यक्त केलीय.

हिंदू बनवण्यास सुरुवात…
“९० च्या दशकामध्ये भारताला मानसिक दृष्ट्या हिंदू बनवण्याचा प्रयत्न सुरु झाला. तो आधी नव्हता असं नाही पण तो नेटाने सुरु झाला. रामजन्मभूमी वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदूंचं एकीकरण झालं. आपलं धार्मिक असणं, ते मिरवणं, त्याचा गवगवा करणं ही प्रक्रिया ९० च्या दशकामध्ये गतिमान झाली,” असं पळशीकर यांनी म्हटलं आहे.

अस्मितेची एक व्याख्या म्हणून वापरतो
९० च्या दशकामधील घडामोडींनंतर, “मी हिंदू आहे हा मुद्दा राहिला नाही. तर मी हिंदू आहे हे ऑन द टॉप म्हणजेच घराच्या वर उभा राहून ओरडून सांगतोय आणि ते मी इतर व्यवहारांसाठी आणि अस्मितेची एक व्याख्या म्हणून वापरतोय,” असं पळशीकर यांनी म्हटलंय. मग साहजिकच झालं की लग्न, व्यवहार, मैत्री या गोष्टींमध्येही आपल्या जातीधर्माचा आधार घेतला जाऊ लागला. अशाप्रकारचा एक सांस्कृतिक परिसर विकसित व्हायला लागल्याचं पळशीकर सांगतात.

आडवाणींनी प्रक्रिया सुरु केली
“अमित शाह, नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ आले आणि त्यांनी हे घडवलेलं नाहीय. ते फक्त त्यावर जोर देताना दिसतायत. तो या गोष्टीचा अधिक फायदा मिळवण्यासाठी वापर करुन ती प्रक्रिया पुढे नेतायत. प्रक्रिया आडवाणींनी सुरु केलेली ९० च्या दशकामध्ये. एकूणच मुस्लीम आणि बिगर हिंदूंबद्दलचा पूर्वग्रह आहे, तो जास्त जास्त तीव्र व्हायला लागला आहे. त्याच्या परिणामामधून समाजात जास्तीत जास्त संशयाचं आणि स्वत:च्या धर्माच्या तीव्र अभिमानाचं एक वातावरण तयार व्हायला लागलंय,” असं निरीक्षण पळशीकर यांनी नोंदवलं आहे.

ओबीसी आणि बिगर ओबीसींची मोट
“हिंदूंना राजकारणामध्ये एकत्र करण्याचा प्रकल्प ज्यांनी चालवला त्यांच्याकडे असणारं कौशल्य, त्यांची दूरदृष्टी याला कमी लेखलं गेलं. जर ओबीसी संघटीत झाले तर हिंदूंना कसं संघटीत करणार असा विचार करण्यात आला. पण ओबीसी आणि बिगर ओबीसी यांची सुद्धा मोट बांधता येते हे भाजपाने ९० च्या दशकापासून दाखवून दिलं,” असं सांगत पळशीकर यांनी भाजपाच्या राजकारणावर प्रकाश टाकलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाचं दुहेरी राजकारण…
“आज ९० च्या दशकापासूनचे कल्याण सिंहांच्या काळापासूनचे निकाल पाहिले तर असं दिसेल की थेट ९० च्या दशकापासून मध्यम जातीय आणि ओबीसींना एकत्र आणण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. १९९६, १९९८ आणि १९९९ चं भाजपाचं राष्ट्रीय पातळीवरील यश या मुख्य घटकावर अवलंबून होतं की त्यांना उच्च मध्यम जातींची मतं मिळाली आणि ओबीसींचीही मतं मिळाली. हिंदुत्वाच्या छत्रीखाली (हिंदू अम्ब्रेला) खाली सर्वांना एकत्र करायचं आणि त्या अंतर्गत जातीची अस्मिता वापरुन दुहेरी राजकारण भाजपाने करुन दाखवलं आहे,” असं पळशीकर म्हणतात.