गुरुग्राम येथे टोल नाक्यावर ओळखपत्र मागितल्यामुळे ब्लॉक समितीच्या माजी अध्यक्षाने कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली. तसेच, तेथे तोडफोड करुन धुडगूस घातला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. होशियार यादव असे या माजी अध्यक्षाचे नाव आहे. गुरुग्रामकडे जात असताना यादव खेरकी टोल नाक्यावर तो आला. कर्मचाऱ्याने त्याला टोल भरण्याची विनंती केली. स्थानिक नागरिक आहोत असे सांगून त्याने टोल भरण्यास टाळाटाळ केली. जर तुम्ही स्थानिक असाल तर तुमची कागदपत्रे आणि ओळखपत्र दाखवा असे टोल बूथवरील कर्मचाऱ्याने म्हटले.

असे म्हणताच होशियार यादवच पारा चढला आणि त्याने टोल बूथमध्ये घुसून कर्मचाऱ्याला मारहाण सुरू केली. त्याठिकाणी असलेले फोन, कॉम्प्युटर इत्यादी सर्व वस्तूंची तोडफोड केली. होशियार यादव सोबत काही लोक होते त्यांनी देखील तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणात होशियार यादववर खेरकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  होशियार यादवने ओळखपत्र दाखवण्यास नकार दिल्यानंतर टोल बूथवरील कर्मचाऱ्याने पैसे मागितले आणि होशियार यादव चिडला. आतमध्ये घुसून त्याने प्रथम कर्मचाऱ्यावर हात चालवला. त्याला खाली दाबण्याचा प्रयत्न केला. तितक्यात होशियार यादवसोबत असलेल्या व्यक्तीनेही कर्मचाऱ्यास मारहाण केली. त्याला मारहाण होत आहे असे पाहून तेथील दुसरे कर्मचारी त्याला वाचविण्यासाठी सरसावले. त्यांनी त्याला बाहेर काढले.  होशियार यादव आणि सोबतच्या व्यक्तीने कॉम्प्युटर, फोनचीही तोडफोड केली. पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये टोल बूथवर होणारी भांडणे आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले.