अमेरिकेने सीरियात अलीकडेच केलेल्या हल्ल्यात आयसिसचा कमांडर ओमर अल-शिशानी ऊर्फ ओमर द चेचेन हा गंभीररीत्या जखमी झाला आहे, ठार झालेला नाही, असा दावा एका गटाने केला आहे. ब्रिटनस्थित सीरियाच्या मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी जिहादींच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला, त्यामध्ये शिशानी गंभीर जखमी झाला तर त्यांचा अंगरक्षक ठार झाला, असे सांगण्यात येत आहे. शिशानी ठार झालेला नाही, असे मानवी हक्क कार्यालयाचे संचालक रामी अब्देल यांनी सांगितले.
शिशानी याला हसाके प्रांतातून राका प्रांतातील रुग्णालयात नेण्यात आले असून त्याच्यावर युरोपीय वंशाचा जिहादी डॉक्टर उपचार करीत आहे. राका हा आयसिसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिशानी याला मृत घोषित करण्यात येणार होते; परंतु अमेरिकेची लढाऊ विमाने आणि ड्रोन हल्ल्यात तो अन्य १२ जणांसह ठार झाला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.