नवी दिल्ली : गुन्ह्याच्या कबुलीसाठी आणि विरोधी पक्षांशी संबंध असल्याचे मान्य करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विजेचे धक्के देण्याबरोबरच अन्य मार्गानीही आमचा छळ केला, असा आरोप संसदेत घुसखोरीप्रकरणी कोठडीत असलेल्या सहा आरोपींपैकी पाच जणांनी बुधवारी केला. मनोरंजन डी., सागर शर्मा, ललित झा, अमोल शिंदे आणि महेश कुमावत या आरोपींनी दिल्लीचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांच्यापुढे एका अर्जाद्वारे दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले.

हेही वाचा >>> भ्रष्टाचार निर्देशांकात भारताची घसरण;१८० देशांमध्ये ९३व्या स्थानी, डेन्मार्क पहिल्यास्थानी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दिल्ली पोलिसांनी सुमारे ७० कोऱ्या कागदांवर आमच्यापैकी प्रत्येकाची बळजबरीने सही घेतली. तसेच गुन्ह्याची कबुली देण्यासाठी आणि आमचा संबंध विरोधी पक्षांशी असल्याचे आम्ही मान्य करावे, यासाठी पोलिसांनी आमचा छळ केला. इतकेच नव्हे तर आम्हाला विजेचे धक्केही देण्यात आले,’ असे या आरोपींनी अर्जात नमूद केले आहे. आणखी एक आरोपी नीलम आझाद हिच्यासह संसद घुसखोरी प्रकरणातील सहाही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींच्या अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने न्यायालयाकडे अवधी मागून घेतला. त्यामुळे या प्रकरणावरील सुनावणी आता १७ फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे. या पूर्वीच्या सुनावणीतही नीलम आझाद हिने पोलिसांनी ५२ कोऱ्या कागदांवर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा आरोप केला होता. तिचा अर्ज न्यायालयापुढे प्रलंबित आहे.