पीटीआय, गुवाहाटी : आसाममधील बहुतांश नद्यांची पाणी ओसरू लागले आहे. तरीही २२ लाखांहून अधिक नागरिक अद्याप पूरग्रस्त आहेत. कच्छर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिलचरमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे व अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रविवारी आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांचा आकडा १२६ वर पोहोचला असून, दोन जण बेपत्ता आहेत.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रसृत केलेल्या माहितीपत्रकानुसार, रविवारी २८ जिल्ह्यांत २२ लाख २१ हजार नागरिक पूरग्रस्त आहेत. आदल्या दिवशी २५ लाख १० हजार होती. कोपिली, बराक आणि कुशियारा नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. एक आठवडय़ापेक्षा जास्त काळ पाण्याखाली असलेल्या सिलचरमधील ज्या भागात प्रशासन अद्याप पोहोचलेले नाही, अशा भागांत मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून  जीवनावश्यक वस्तू  पोहोचवल्या जात आहेत. कच्छरचे उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी सांगितले की, चालकरहित उपकरणांद्वारे (यूएव्ही) विविध भागांत झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह युनिसेफ, ऑक्सफॅमसारख्या संस्थांनी सिलचर आणि परिसरातील गरजू लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नावांवर जलशुद्धीकरण केंद्र सुरू केली आहेत. मुख्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांनी रविवारी सिलचरला दोनदा भेट देऊन मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला. बेटकुंडी येथील बंधारा फुटल्यानंतर पाणी घुसल्याने सिलचरची स्थिती अधिक गंभीर झाली. हा बंधारा काही चोरटय़ांनी फोडल्याचा आरोप आहे. येथील पूर हा मानवनिर्मित असल्याचा आरोप सरमा यांनीही केला.