करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकार आवश्यक ती पावलं उचलत आहेत. महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व गोष्टी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे. राजस्थानच्या भिलवाडा मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये फिरायला आलेल्या ६९ वर्षीय इटालियन नागरिकाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याचंही डॉक्टरांनी जाहीर केलं होतं. यानंतर ह्रदय बंद पडल्यामुळे जयपूरमधील एका रुग्णालयात या इटालियन नागरिकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेमुळे भिलवाडा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे खासगी रुग्णालयातील तीन डॉक्टरांनाही करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय.
परिस्थितीचं गांभीर्य ओळखून स्थानिक जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही घडलेल्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “दोन दिवसांपूर्वी परिस्थिती नियंत्रणात येत आहे असं आम्हाला वाटत होतं, मात्र एकापाठोपाठ एक रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. गरजेनुसार योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलवाडामध्ये २८ जणांची करोना चाचणी करण्यात आली असून यामधील ६ लोकांना लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. ११ जणांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं आढळली नसून इतर चाचण्यांचे निकाल येणं बाकी आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरीने प्रयत्न करत आहे.