लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांची ग्वाही * नियंत्रण रेषेवर कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्याची सज्जता

श्रीनगर :नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची चिंता काश्मीरच्या लोकांनी करू नये त्यासाठी लष्कर सुसज्ज आहे, कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याची आमची तयारी आहे, असे बारामुल्ला जिल्ह्य़ात बोनियार येथे लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी सांगितले.

ते म्हणाले की,  नियंत्रण रेषेवरील परिस्थिती चांगली असून आम्ही सज्ज आहोत व परिस्थितीही नियंत्रणात आहे. कुणीही काळजी करण्याचे कारण नाही.

किरकोळ घटना घडत असतात पण एकूण काश्मीरमधील परिस्थिती चांगली आहे असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, आता पर्यटकांची संख्या वाढत असून तेथे लोकांना खोल्या मिळत नाहीत इतकी मागणी आहे. लोकांना आता फुटीरतावाद्यांचा डाव कळून चुकला आहे. परिस्थिती अशीच  शांत राहील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्या अगोदर त्यांनी काश्मीरमधील डिजिटल लष्करी शाळेचे उद्घाटन केले. जीवनाचे सर्व अंग तंत्रज्ञानाने व्यापले आहे. भारतीय लष्करानेही अनेक अभिनव बदल आत्मसात केले आहेत. लष्कराच्या शाळांमध्ये त्याचा वापर केला जात आहे. बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा व अनंतनाग येथे लष्करी शाळांचे डिजिटलायझेशन करण्याचे  प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यात पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. या कंपनीचे सहकार्य आहे. एकूण १२८ वर्गामध्ये स्मार्ट तंत्रज्ञानातून वर्ग सुरू करण्यात येणार असून हा प्रकल्प ३.१ कोटी रुपयांचा आहे. मार्च २०२० मध्ये या कामाला सुरुवात झाली होती पण गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या करोना काळात तो रेंगाळला होता. आतापर्यंत लष्कराच्या २८ पैकी १६ शाळांचे डिजिटलायझेशन झाले आहे.