YouTuber Elvish Yadav: प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव यांच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी आज सकाळी गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी दोन डझन गोळ्या यादवच्या घरावर झाडल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना सकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास घडली. दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला. जवळपास दोन डझन गोळ्या झाडल्याचे निशाण घरावर दिसून आले आहेत. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
न्यूज१८ ने दिलेल्या बातमीनुसार, गोळीबार झाला तेव्हा एल्विश यादव घरात उपस्थित नव्हता. तसेच जेव्हा गोळीबार झाला तेव्हा घरात फक्त केअरटेकर होता. पोलीस घटनास्थळाची पाहणी करत आहेत. त्यांनी फॉरेन्सिक तपासणी केली असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार फक्त तळमजला आणि पहिल्या मजल्यावर करण्यात आला. एल्विश यादव या घरात दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर राहतो. एल्विश यादवने अद्याप या घटनेची औपचारिक तक्रार नोंदविलेली नाही, अशी माहिती मिळत आहे.
एल्विश यादवच्या वडिलांची प्रतिक्रिया इंडिया टुडेने दिली आहे. ते म्हणाले, “गोळीबारापूर्वी आम्हाला कोणतीही धमकी मिळाली नव्हती. एल्विश सध्या हरियाणाबाहेर आहे. आम्ही झोपलो होतो तेव्हा हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी गोळीबार केला. तीन हल्लेखोर होते, तिघांनी मास्क घातला होता. एक जण दुचाकीवर बसला असताना इतर दोघांनी खाली उतरून गोळीबार केला.”
दोन्ही हल्लेखोरांनी सुमारे २५ ते ३० राउंड गोळीबार केला आणि त्यानंतर पळ काढला, असे एल्विशच्या वडिलांनी सांगितले.
कोण आह एल्विश यादव?
एल्विश यादवने २०२३ साली बिग बॉस ओटीटी हा शो जिंकला होता. त्यापूर्वी तो युट्यूबर म्हणून प्रसिद्धीस आला होता. त्याचे अनेक ऑनलाइन चाहते आहेत. प्रसिद्ध झाल्यानंतर तो अनेक संगीत व्हिडीओ आणि चित्रपटातही दिसला होता.
मागच्या वर्षी रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा वापर केल्याच्या आरोपाखाली नोएडा पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलिसांनी दावा केला होता की, विषारी सापाचे विष ड्रग्ज म्हणून पुरवले जात होते. या ड्रग्ज पुरविण्याची व्यवस्था एल्विशने केली होती. नंतर त्याला जामीन मंजूर झाला होता.